बेळगाव लाईव्ह :बेळगाव महापालिकेतील सत्ताधारी गट व मनपा आयुक्त यांच्यात छुपा संघर्ष सुरू असतानाच महापौर शोभा सोमनाचे यांनी आयुक्तांसह महसूल उपायुक्त आणि कौन्सिल सेक्रेटरी यांच्या विरोधात हे तिघेही शासनाला चुकीची माहिती देत असल्याची लेखी तक्रार प्रादेशिक आयुक्तांकडे करण्याबरोबरच या अधिकाऱ्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे
महापालिकेच्या सर्वसाधारण बैठकीत 2023 24 या आर्थिक वर्षात घरपट्टी वाढवण्याबाबतचा ठराव मंजूर करण्यात आला होता. मात्र आयुक्त व संबंधित अधिकाऱ्यांनी राज्य शासनाला चुकीची माहिती दिली कागदपत्रांमध्ये फेरफार केले असे महापौरांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे.
अधिकाऱ्यांनी केलेले हे कृत्य म्हणजे एक प्रकारचा गुन्हाच आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी त्यांनी केली आहे.
आपल्याला कन्नड भाषा येत नाही याचा फायदा घेत कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याचा आरोप महापौराने आपल्या तक्रारीत नमूद केला आहे. प्रादेशिक आयुक्तांकडून ही तक्रार पुढील कार्यवाहीसाठी शासनाकडे पाठवली जाणार आहे.
तथापि राज्यात काँग्रेस पक्षाचे सरकार सत्तेवर असल्यामुळे या तक्रारीची दखल किती गांभीर्याने घेतली जाणार? हा देखील एक प्रश्नच आहे.