बेळगाव लाईव्ह :बेळगाव लाईव्ह: बेळगाव शहरात नवीन यू जी डी साठी अकराशे कोटींचा प्रस्ताव नगरविकास मंत्र्यांकडे दिला असल्याची माहिती बेळगाव उत्तरचे आमदार असिफ सेठ यांनी शनिवारीच महापालिका बैठकीत दिली.
बुडाकडून विकसित करण्यात आलेल्या वसाहतींत सांडपाणी वाहिनी, रस्ते, गटार, पाण्याची समस्या आहे. त्यामुळे पाहणी केल्यानंतरच वसाहतीच्या हस्तांतराचा निर्णय घेण्यात यावा, अशी सूचना नगरसेवक हणमंत कोंगाली यांनी केली त्यावर उत्तर देताना एलअॅण्डटी कंपनीच्या कामाबाबत अनेक तक्रारी आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. आपण मंत्र्यांकडे नव्या सांडपाणी वाहिनीसाठी 1100 कोटींचा प्रस्ताव दिला आहे, अशी माहिती आमदार असिफ सेठ यांनी दिली.महापालिका सभागृहात शनिवारी (दि. 7) सर्वसाधारण सभा झाली. अध्यक्षस्थानी महापौर शोभा सोमनाचे होत्या.
हेस्कॉमने महापालिकेचे 17 कोटी 80 लाख दिलेले नाहीत. वारंवार पत्रव्यवहार करूनही हे पैसे मिळत नाहीत. त्यामुळे जोपर्यंत ही रक्कम मिळत नाही. तोपर्यंत हेस्कॉमचे बिल भरण्यात येऊ नये, अशी मागणी नगरसेवकांनी केली. त्यावर आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी थकीत बिलाबाबत आपण स्वत: हेस्कॉमच्या व्यवस्थापकीय संचालकांशी चर्चा करणार असल्याचे सांगितले.
सुरुवातीला सभा सुरू होताच नगरसेवकांनी हेस्कॉमच्या थकीत बिलाचा विषय मांडला. पाच वर्षांपासून हेस्कॉमकडे महापालिकेचे 17 कोटी 80 लाख रूपये थकीत आहेत. महापालिका दरवर्षी 70 लाख रूपयांचे बिल भरत आली आहे. त्यामुळे हेस्कॉमकडून ही थकीत रक्कम कधी वसूल करणार, असा सवाल नगरसेवक गिरीश धोंगडी, बाबाजान मतवाले, रवी साळुंखे यांनी उपस्थित केला. त्यावर आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी हेस्कॉमच्या थकीत बिलाबाबत आपल्याला काही दिवसांपूर्वी माहिती मिळाली. त्यानंतर मी त्यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे. पण, आता ही रक्कम मिळवण्यासाठी स्वत: व्यवस्थापकीय संचालकांशी बोलून घेणार आहे, असे सांगितले.
पंधराव्या वित्त आयोगाकडून आलेल्या निधीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रत्येक प्रभागाला केवळ 12 लाख रूपये देण्यात येणार असल्यामुळे नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. नगरसेवकांच्या मागणीनुसार दक्षिण आणि उत्तरसाठी प्रत्येकी दोन हायटेक स्वच्छतागृहे उभारणी करण्यात येणार असल्याचे महापौर सोमनाचे यांनी सांगितले. नगरसेवकांना इतिवृत्त आणि सभेची नोटीस वेळेत मिळत नसल्यामुळे नाराजी व्यक्त केली.
एसपीएम रोडवर पुन्हा फेरीवाले
गणेशोत्सवानिमित्त एसपीएम रोडवरून हटवण्यात आलेल्या फेरीवाल्यांना पुन्हा त्याठिकाणी जागा देण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक राजू भातकांडे यांनी केली. त्यावर महापौर सोमनाचे यांनी फेरीवाल्यांना एसपीएम रोडवर पुन्हा व्यापार करण्यास परवानगी दिली.