Monday, December 23, 2024

/

विरोध डावलून हटवण्यात आले ध. संभाजी चौकातील फलक

 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगाव महापालिकेतर्फे धर्मवीर संभाजी महाराज चौकातील कन्नड वगळता अन्य भाषेतील नवरात्री, दसरा व श्री दुर्गामाता दौड यांचे शुभेच्छा फलक हटवण्याची मोहीम आज गुरुवारी स्थानिकांचा विरोध डावलून राबविण्यात आली. महापालिकेच्या या कारवाईमुळे शहरात सर्वत्र तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

व्यापारी आस्थापनांच्या फलकांवरील 60 टक्के मजकूर कन्नड भाषेत हवा असा सक्तीचा फतवा काढणाऱ्या महापालिकेने सध्या ऐनसणासुदीच्या काळात सार्वजनिक ठिकाणी असलेल्या फलकांच्या बाबतीतही कन्नड सक्तीचा वरवंटा फिरवण्यास सुरुवात केली आहे. महापालिकेच्या महसूल व अतिक्रमण हटाव विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आज गुरुवारी सायंकाळी धर्मवीर संभाजी महाराज चौकात विविध नेते आणि संघटनांकडून उभारण्यात आलेले नवरात्र, श्री दुर्गामाता दौड व दसरा सणाचे शुभेच्छा फलक हटविले.

महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी, उपायुक्त रेश्मा तालीकोटी यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही फरक हटाव मोहीम राबविण्यात आली सदर मोहिमेला प्रारंभी स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांनी तीव्र विरोध करून जाब विचारला. तसेच शुभेच्छा फलक काढण्यासंबंधीच्या आदेशाच्या प्रतिबाबत विचारणा केली. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून प्रत्येक फलकावरील 60 टक्के भागातील मजकूर हा कन्नड भाषेत असावा तर उर्वरित 40 टक्के भागात अन्य कोणत्याही भाषेचा वापर केला जावा, या सरकारच्या आदेशाची आम्ही अंमलबजावणी करत आहोत असे स्पष्टीकरण महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिले.Marathi board

धर्मवीर संभाजी महाराज चौकात राबविण्यात आलेल्या फलक हटाव मोहिमेअंतर्गत संपूर्णपणे कन्नड भाषेत असलेला जिल्हा पालकमंत्र्यांचा फलक वगळता अन्य नेते मंडळींचे शुभेच्छा फलक काढून टाकण्यात आले काही मराठी शुभेच्छा फलकांवर कन्नड भाषेत देखील मजकूर होता मात्र असे फलक देखील हटविण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देखील कन्नड सक्तीने झपाटलेल्या बेळगाव महापालिकेच्या तडाख्यातून सुटू शकले नाहीत.

महापालिकाने त्यांच्या छायाचित्रासह झळकलेले शुभेच्छा फलक देखील काढून टाकत पंतप्रधान असो किंवा अन्य कोणी आम्हाला सर्वजण समान हेच जणू दाखवून दिले. याबद्दल धर्मवीर संभाजी चौक परिसरात सखेद आश्चर्य व्यक्त होण्याबरोबरच सणाच्या काळात महापालिका शुभेच्छा फलकांविरुद्ध राबवत असलेल्या या मोहिमेचा शहरातील नागरिकांकडून धिक्कार केला जात आहे.

दरम्यान, फलक हटाव मोहिमेवरून पोलीस व महापालिका प्रशासन यांच्यात मतभेद निर्माण झाल्याचे समजते. सणासुदीच्या काळात महापालिकेने सुरू केलेल्या या मोहिमेवरून शहरात तणावाची स्थिती निर्माण होत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या संदर्भात पोलिस अधिकाऱ्यांनी महापालिका अधिकाऱ्यांना जाबही विचारला असल्याचे कळते. शहरात लावलेले बहुतेक फलक लोकप्रतिनिधी, माजी लोकप्रतिनिधी, राजकीय व्यक्ती, लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेले सर्वपक्षीय नेते तसेच बेळगावतील कांही प्रमुख संघटनाशी संबंधित आहेत. नवरात्री, दसरा, दिवाळी, दुर्गामाता दौडसाठी शुभेच्छा देणारे हे फलक आहेत. राजोत्सवाच्या शुभेच्छा देणारे फलक ही शहरभर लावलेले आहेत.

यापैकी बहुतेक सर्व फलक विनापरवाना लावले असल्यामुळे ते फलकटवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. तथापि 1 नोव्हेंबरच्या राज्योत्सवाच्या निमित्ताने शहरातील चन्नम्मा चौक तसेच अन्य मुख्याच्या ठिकाणी कन्नड संघटनांकडून फलक लावण्यात आले आहेत. त्या फलकांवर कारवाई न करता नवरात्री, दसरा, श्री दुर्गामाता दौडच्या निमित्ताने लावलेली स्वागत कमानी, फलक हटविण्याच्या महापालिकेच्या निर्णयाबद्दल विशेष करून मराठी भाषिकांत तीव्र नापसंती व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.