बेळगाव लाईव्ह :हनीट्रॅपचा आरोप करत एका महिलेची गळ्यात चपलांचा हार घालून तिची गावात धिंड काढण्याच्या निंद्य घटनेची गंभीर दखल घेत घटप्रभा पोलिसांनी शोषित महिलेने दिलेल्या माहिती आधारे कांही महिलांसह एकूण 25 जणांवर गुन्हा दाखल करून त्यांना गजाआड केले आहे.
सदर प्रकरणातील मुख्य आरोपी अर्जुन गंडप्पगोळ याला शनिवारी रात्रीच ताब्यात घेऊन पोलिसांनी त्याला न्यायालयासमोर हजर केले आहे. गळ्यात चपलेचा हार घालून रस्त्यावर महिलेची धिंड काढण्याच्या अमानुष कृत्यात आरोपीला सहकार्य करणाऱ्या महिला व पुरुष अशा एकूण 25 जणांवर देखील भा. द. वि. कलम 143, 147, 342, 323, 354 (बी), 355, 360, 504 सहकलम 149 अन्वये गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे. त्याचप्रमाणे घटप्रभा पोलीस अन्य आरोपींचा देखील शोध घेत आहेत.
बेळगाव जिल्हा हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या शोषित महिलेने दिलेल्या तक्रारीमध्ये 25 हून अधिक जणांच्या जमावाने घरात घुसून माझ्यावर हल्ला केला.
तसेच आरोपी अर्जुन याने मला तू आमच्याविरुद्ध केलेली तक्रार मागे घे आणि मला 5 लाख रुपये देऊन गाव सोडून निघून जा अशी धमकी दिली. त्यानंतर जमलेल्या जमावाने गळ्यात चपलांचा हार घालून मारहाण करत माझी रस्त्यावरून मानहानीकारक धिंड काढली. मारहाणीमुळे माझा हात फ्रॅक्चर झाला आहे. अर्वाच्य शिवीगाळ करत मला जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली, असा तपशील नमूद आहे.
या प्रकरणाची थोडक्यात पार्श्वभूमी अशी की, घटप्रभा येथे गेल्या शुक्रवारी 13 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री हनीट्रॅप करून पैशासाठी ब्लॅकमेल करीत असल्याचा ठपका ठेवत एका महिलेला घरातून बाहेर काढून तिच्या गळ्यात चपलांचा हार घालून गावात तिची दिंड काढण्यात आली.
माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेची तीव्र परिसाद जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात उमटली. तसेच पोलीस खात्याचा निषेध होण्याबरोबरच आरोपींना कठोर शासन केले जावे अशी जोरदार मागणी करण्यात आली. परिणामी पोलिसांनी शोषित महिलेने केलेल्या तक्रारीच्या आधारे आरोपींच्या अटकेची कारवाई सुरू केली आहे.