बेळगाव लाईव्ह:राज्याच्या नगर विकास प्रशासन खात्याने घेतलेल्या निर्णयानुसार बेळगाव महानगरपालिकेकडून कचरा वर्गीकरण मोहिमेला आज मंगळवारपासून प्रारंभ झाला आहे. या मोहिमेसाठी शहरात 10 कचरा वर्गीकरण केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत.
राज्यातील सर्व महापालिका कार्यक्षेत्रात कचरा वर्गीकरण मोहीम राबविण्याचा निर्णय नगर प्रशासन खात्याने घेतला आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून याची माहिती आधीच देण्यात आली आहे. या मोहिमेचे अंमलबजावणी करण्यासाठीची मार्गदर्शक तत्वे महापालिकेला पाठवण्यात आली आहेत.
शहरातील प्रत्येक घरातील ओला व सुका कचरा वेगवेगळा जमा करण्याचे उद्दिष्ट महापालिकेसमोर आहे. सदर उद्दिष्ट सप्टेंबर ते नोव्हेंबर 2023 या तीन महिन्यात पूर्ण करावे लागणार आहे.
सदर मोहिमेअंतर्गत प्रत्येक घरातील ओला व सुका कचरा वेगळा जमा केला जाणार आहे. सुक्या कचऱ्याचे देखील पुन्हा 6 प्रकारात वर्गीकरण केले जाणार आहे. या मोहिमेसाठी शहरात 10 कचरावरीकरण केंद्रे स्थापना आली आहेत. कचऱ्यातील कापड, प्लास्टिक, बाटल्या, काचेचे ग्लास, अन्य वस्तू वेगळे केले जाणार असून पादत्राने, ई -कचरा, धोकादायक कचरा, वैद्यकीय कचरा वेगळा केला जाणार आहे.
दरम्यान, बेळगाव महापालिकेने काल सोमवारपासूनच शहरात कचरा वर्गीकरण सुरू केले आहे. नगर प्रशासन खात्याकडून 4 सप्टेंबर पासून राज्यात कचरा वर्गीकरण मोहिमेचा प्रारंभ झाला आहे. मात्र बेळगावात ही मोहीम आज मंगळवारपासून अधिकृतपणे सुरू होत आहे. महापालिकेकडून कांही महिन्यांपूर्वी कायमस्वरूपी सुका कचरा संकलन केंद्राची स्थापना करण्यात आली होती.
त्यात जमा होणारे साहित्य किंवा कचऱ्याचा पुनर्वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या केंद्रांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. तथापि आता ही नवी कचरा वर्गीकरण मोहीम मात्र प्रभावीपणे राबविली जाणार आहे.