Sunday, December 22, 2024

/

लोकायुक्तांनी स्मार्ट सिटीच्या भ्रष्ट गैरकारभाराची चौकशी करावी -टोपण्णावर

 belgaum

बेळगाव लाईव्ह:बेळगाव दक्षिण मतदार संघातील एसबीआय सर्कल ते ओल्ड पीबी रोड पर्यंतचा स्मार्ट सिटीच्या अवैज्ञानिक रस्त्यासंदर्भात कर्नाटक लोकायुक्तांनी सुओ मोटो गुन्हा दाखल करून बेळगाव स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत घडलेल्या गैरकारभार व भ्रष्टाचाराची चौकशी करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजकुमार उर्फ राजू टोपण्णावर आणि सुजित मुळगुंद यांनी केली आहे.

शहरात आज मंगळवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. बेळगाव स्मार्ट सिटी साठी केंद्र सरकारकडून 900 कोटी रुपयांहून अधिक अनुदान आले होते. सदर अनुदानाचा संपूर्ण विनीयोग करण्यात आला असल्याचे बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेड करून सांगण्यात येत असल्याचे समजते. मात्र वस्तुस्थिती लक्षात घेता कांही ठराविक भाग वगळता शहरातील बहुतांश भागात स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत अवैज्ञानिक पद्धतीने रस्ते, गटारी वगैरे विकास कामे करण्यात आली आहेत. मुळात बेळगावमध्ये स्मार्ट सिटी योजना राबविण्यासाठी चांगली नियोजन समितीच नेमण्यात आलेली नाही. या खेरीज शहरातील जी विकास कामे करण्यात आली आहेत ती एका डबघाईला आलेल्या परदेशातील कंपनीतील कामाचा पुरेसा अनुभव नसलेल्या अपात्र अभियंत्यांकडून करून घेण्यात आली आहेत.

कर्नाटक उच्च न्यायालयाने अलीकडे बेळगाव दक्षिण मतदार संघातील एसबीआय सर्कल ते ओल्ड पी. बी. रोडपर्यंतचा अवैज्ञानिक पद्धतीने बांधण्यात आलेल्या स्मार्ट सिटीच्या रस्त्यासाठी ज्या नागरिकांच्या मालमत्तेचे जबरदस्तीने बेकायदा नुकसान करण्यात आले त्यांना त्यांच्या जागेसह नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला आहे. मात्र आता मुद्दा हा उपस्थित झाला आहे की ही नुकसान भरपाई कोण देणार? कारण केंद्राने दिलेला 900 कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. त्यामुळे ज्या अधिकाऱ्यांनी बेकायदेशीररित्या काम करून केंद्राच्या अर्थात जनतेच्या पैशाची विल्हेवाट लावली आहे त्यांच्याकडून संबंधित नुकसान भरपाई वसूल केली जावी आणि ती संबंधित नुकसानग्रस्तांना दिली जावी अशी आमची मागणी आहे. त्याचप्रमाणे स्मार्ट सिटी योजनेसारख्या मोठ्या जबाबदारीच्या योजनेअंतर्गत काम करणाऱ्यांची पात्रता तशी असली पाहिजे. त्यांना संबंधित कामाचा तसा प्रदीर्घ अनुभव असला पाहिजे. मात्र या संदर्भातील सर्व नियम पायदळी तुडवत बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडने मनमानी केली आहे. तेंव्हा कर्नाटक लोकायुक्तांनी सुमोटो गुन्हा दाखल करून बेळगाव स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत घडलेल्या गैरकारभार व भ्रष्टाचाराची चौकशी करावी अशी आमची मागणी आहे, असे बेळगाव भ्रष्टाचार निर्मूलन परिवार या संघटनेचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते सुजित मुळगुंद यांनी सांगितले.Press smart city

आम आदमी पक्षाचे नेते सामाजिक कार्यकर्ते राजू टोपण्णावर यांनी यावेळी बोलताना स्मार्ट सिटी योजनेच्या नावाखाली स्थानिक भाजप नेत्यांनी केलेल्या मनमानी कारभाराची माहिती दिली. बेळगाव स्मार्ट सिटी बनविण्याची नियोजित योजना अंमलात आणण्याऐवजी ती बाजूला सारून सदर नेत्यांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरून प्रचंड भ्रष्टाचार करत या योजनेचे स्वरूपच पालटले आहे, असा आरोप त्यांनी केला. स्मार्ट सिटी लिमिटेड अंतर्गत अपात्र अभियंत्यांकडून करून घेण्यात आलेली निकृष्ट अवैज्ञानिक विकास कामे आदींबाबत विस्तृत माहिती देताना बेळगाव स्मार्ट सिटी योजनेच्या प्रत्येक व्यवस्थापकीय संचालकाच्या कार्यकाळात घडलेल्या चुकांचा कागदोपत्री पुरावा आपल्याकडे आहे असे स्पष्ट करून यासाठीच कर्नाटक लोकायुक्तांनी सुमोटो गुन्हा दाखल करून बेळगाव स्मार्ट सिटी योजनेतील गैरकारभार व भ्रष्टाचाराची चौकशी करावी.

आम्ही जो कर भरतो त्यामधूनच शहरातील विकास कामे केली जात आहेत. बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडला मिळणारा पैसा हा जनतेचा पैसा आहे. त्यामुळे बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेड ऐवजी स्मार्ट सिटीचे आतापर्यंतचे सर्व व्यवस्थापकीय संचालक, मुख्य कार्यकारी अभियंता आणि सहाय्यक कार्यकारी अभियंता यांना जबाबदार धरून त्यांच्याकडून नुकसान भरपाईची रक्कम वसूल केली जावी, अशी आमची मागणी असल्याचे टोपण्णावर यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.