रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या मध्य प्रदेश येथील आठ प्रवाशांना अमुल लिहिलेले चॉकलेट व चिप्समधून गुंगीचे औषध देऊन लुबाडणाऱ्या बिहारीच्या त्रिकुटाला मडगाव (गोवा) रेल्वे सुरक्षा दलाने गजाआड केले आहे.
मोहम्मद सरताज (वय 29, रा. बुद्धीकाशीबारी), चंदन कुमार (वय 23, रा. जगदाळ) आणि दिराकुमार (वय 29, रा. जगदाळ) अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
मडगाव रेल्वे स्थानकावर गुन्हा करण्याच्या प्रयत्नात असताना रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने त्यांना अटक केली. सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली.
निजामुद्दीन एक्सप्रेस मधून प्रवास करणाऱ्या मध्य प्रदेशातील आठ तरुणांना गुंगीचे औषध देऊन त्यांच्याकडील 7 मोबाईल संच व 25 हजार रुपयांची रक्कम असा सुमारे लाखाचा ऐवज लांबविण्यात आल्याची घटना गेल्या 11 सप्टेंबर रोजी उघडकीस आली होती.
बेळगाव रेल्वे पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली होती. हद्दीच्या आधारावर हे प्रकरण मडगाव -गोवा रेल्वे पोलिसांकडे वर्ग करण्यात आले असून आता गोवा पोलिसांनी वरील प्रमाणे तिघाजणांना ताब्यात घेतले आहे.