निसर्गाचे वरदान लाभलेला थायलंड
(अलीकडेच प्रतिक टूर्स कडून आम्ही दहा जण थायलंडच्या प्रवासाला जाऊन आलो एक वेगळा आणि मनमुराद आनंद देणारी ही आमची सहल ठरली त्या सहलीबाबत थोडेसे….)
बेळगाव लाईव्ह :काही वर्षांपूर्वी म्हणजे नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर मी एक नक्की ठरविले होते की जमेल तसे आपल्या देशाची भ्रमंती करायची आणि त्याबरोबरच जगभर भटकायचे, आणि ते काही वर्षे जमले सुद्धा. ठरवल्याप्रमाणे युरोप खंडाचा (कारण त्या अगोदर माझा अमेरिका आणि कॅनडाचा प्रवास झाला होता) आणि भारतातील अप्रतिम अशा अंदमान- निकोबार चा प्रवास आम्ही केला. त्यानंतरची दोन वर्षे कोरोना आला आणि आमचा प्रवास थांबला .त्यानंतर मात्र ठरल्याप्रमाणे देशभरातील विविध ठिकाणी जाऊन आलो आणि आत्ता थायलंडचा प्रवास निश्चित केला.
थायलंडमध्ये असलेल्या एकंदर 77 प्रोविन्स (प्रांत)मध्ये केवळ बँकॉक आणि पटाया ही दोनच प्रॉव्हिन्स प्रेक्षणीय नसून फुकेत आणि क्राबी हेही दोन प्रेक्षणीय प्रांत आहेत .
मुंबईहून विमानाने आम्ही फुकेतच्या भूमीवर पाय ठेवले. तेथील फॅन्टासी शो, थाई कल्चरल शो एनिमल्स स्टंट्स 4d इफेक्ट्स पाहून थक्क झालो. आमटा पटांग सारख्या एका आलिशान हॉटेलमध्ये आमची राहण्याची सोय करण्यात आली होती.
दुसऱ्या दिवशी फीपी आयलँड आणि माया बी बेटाला भेट दिली. ही बेटे पाहताना एक वेगळा आनंद आपल्याला मिळतो .प्रत्येक बेटाचे वैशिष्ट्य वेगळे आहे .हजारो पर्यटक रोज या बेटांना भेट देत असतात. फुकेतचा दौरा आटोपून आम्ही तिसऱ्या दिवशी क्राबी या प्रांतात पोहोचलो तेथील ब्ल्यू स्टॉल या समुद्रकिनाऱ्याजवळील आलिशान हॉटेलमध्ये आमची रहाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
तेथील टायगर किंग्डम (जेथे वाघांबरोबर आपले फोटो काढता येतात) करून व्ह्यू पॉईंट ,चलाॅग टेम्पल आणि जुने क्राबी शहर पाहिल्यानंतर जुन्या आठवणी जाग्या होतात. चौथा दिवस क्राबी शहरातच गेला. तेथे असलेल्या चार वेगवेगळ्या बेटांना आणि नॅशनल पार्कला आम्ही भेट दिली. हे भव्य राष्ट्रीय पार्क ज्यामध्ये उंच वाढलेल्या वनस्पती पाहायला मिळतात. क्राबीचा दौरा संपून पाचव्या दिवशी आम्ही विमानाने बँकॉकला गेलो.
बँकॉक पासून जवळच असलेल्या पटाया शहरात त्या दिवशी आम्ही संध्याकाळ घालविली. पटाया शहरात असलेला अलका जर शो हा एक मनःपूर्वक आनंद देणारा ठरला .वेगवेगळ्या वेशभूषेतील तरुणी आणि त्यांचे स्टेजवरील डान्स पाहता आपण जुन्या फिल्मी दुनियेत गेलो असल्याचा भास होतो. पटाया शहरात आमचा मुक्काम टोळी जंग अशा पटाया डी बीच या हॉटेलमध्ये होता. आम्ही रात्री फेरफटका मारला. थायलंडमध्ये सेक्स व्यवसाय अमर्याद चालतो अशा पद्धतीने आम्हाला सांगण्यात आले होते तो कदाचित असेलही पण आम्हाला कोठेही अश्लीलपणा जाणवला नाही .डान्स करणाऱ्या अनेक तरुणी दिसल्या. अख्खी रात्र तेथील रस्ते गर्दीने भरलेले असतात. अनेक जण मनमुराद आपल्या मस्तीत वावरत असलेली दिसतात .
सहावा दिवस हा कोरल आयलँड ला स्पीड बोट ने जाण्याचा होता. कोरल आयलँडला निसर्गाचे लाभलेलं वरदान हे उपस्थितांना मंत्रमुग्ध करणार आहे. समुद्राच्या काठावर असलेली रेती घट्ट असल्याने सर्वजण त्या पाण्यात मनसोक्त आनंद लुटताना दिसतात. याच ठिकाणी असलेले मोटार बोट ड्रायव्हिंग हे थ्रिल असते .कोरल बेटावरून आल्यानंतर नुंग नूच व्हिलेज शो नावाचा एक थाई कल्चरल शो आणि हत्तींचा शो पाहण्याचा आनंद वेगळा असतो. इथे असलेली बाग ही एक जगप्रसिद्ध बोटॅनिकल गार्डन असून ती जगभरातील सर्व लोकांसाठी आहे. येथे अलबोन नॉक यांनी जमविलेल्या जगातील अनेक महागड्या कार व जीप गाड्यांचे प्रदर्शन अचंबित करणारे आहे. ते पाहून आम्ही मुक्कामाला गेलो. आणि सातव्या दिवशी सकाळी उठून बँकॉकला निघालो.
बँकॉक हे शहर आर्थिक दृष्ट्या प्रचंड प्रगत आहे. अनेक उंच उंच इमारती , मोठमोठी हॉटेल्स, आणि सुंदर रस्ते हे त्याचे वैशिष्ट्य आहे. बँकॉक शहरात असलेले गोल्डन बुद्धा (जिथे बुद्धाची 90 टन सोने वापरून तयार केलेली पूर्णतः सोन्याची मूर्ती बसवलेली आहे ) हे मंदिर आणि रिकलायिंग बुद्धा (पहूडलेला बुद्ध : जो 45 मीटर लांब व 15 मीटर उंच आहे) हे मंदिर व त्याच्या परिसरात असलेली इतर सुंदर नक्षीकाम केलेली मंदिरे पाहताना थायलंडच्या प्रगल्भ कलेची जाणीव होते.
बँकॉक मधील संध्याकाळ ही चावो फ्राया नदीतून बोटीने प्रवास करणारी ठरली. बोटीत डान्स, म्युझिकल एंटरटेनमेंट आणि जेवणाचा आस्वाद घेऊन रात्री आम्ही रामदा या जुन्यापन भव्य अशा आणि शहराच्या मध्यवर्ती असलेल्या लॉजिंग वर परत आलो.
आठव्या दिवशी बँकॉक मध्ये असलेला सफारी वर्ल्ड मरीन पार्क हा एक अद्भुत पार्क आहे. वाघ- सिंह- जिराफ -अस्वल- गविरेडे यासारखी प्राणी मुक्तपणे विहार करत असलेले दिसतात. (अशा पद्धतीचे ओपन झू मी कॅनडा व अमेरिकन मध्ये सुद्धा पाहिले आहेत ) त्याचबरोबर या सफारी वर्ल्ड मध्ये असलेला डॉल्फिन शो, बर्ड शो, सील्स शो, मंकी शो हे एकापेक्षा एक बहारदार शो उपस्थितांचे मनोरंजन करतात. ज्या पद्धतीने डॉल्फिन्स ना शिकवण्यात आलेले आहे किंवा सील माशांना प्रशिक्षण देण्यात आले आहे ते पाहता माणसापेक्षाही हे प्राणी किती हुशार आहेत याची प्रचिती येते.
नवव्या दिवशी सकाळी आम्ही बँकॉकहून बेंगलोरला विमानाने परतलो आणि सायंकाळी बेंगलोर- बेळगाव विमानाने बेळगावला पोहोचलो. अशा पद्धतीने हा दहा दिवसाचा प्रवास म्हणजे वेगळा आनंद देणारा ठरला .थायलंड बद्दल लोक जे सांगतात ते सगळे काही खरे नाही. खरं बघितलं तर आपण भारतातल्याच एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी आहोत असा भास होतो .
दहा दिवसाच्या कालावधीत आम्हाला कुठेही एक पोलीस दिसला नाही किंवा आमच्या गाडीच्या ड्रायव्हरने एकदाही हॉर्न वाजवला नाही. विनम्रता प्रत्येक ठिकाणी ठाई ठाई भरलेली दिसते .कुठेही अगंतूकपणा किंवा अश्लीलता जाणवत नाही. थायलंडला लाभलेली बेट ही जशी प्रेक्षणीय आहेत तशीच भेट देणाऱ्यांना मनःपूर्वक आनंद देणारी आहेत. आमच्यासाठी रिझर्व केलेली फोर स्टार हॉटेल्स आणि सगळीकडे मिळणारे शुद्ध शाकाहारी जेवण तेही भारतीयांच्या हॉटेलमध्ये हा अनुभवच वेगळा असतो. त्यामुळे प्रत्येकाने एकदा थायलंडचा प्रवास करावा असा आम्हाला वाटतं.
– अनंत लाड, बेळगाव
तुम्हालाही या निसर्गरम्य थायलंड बँकॉक ची सफर करायची असल्यास बेळगावच्या नामांकित प्रतीक टूर्स शी संपर्क करा : मोबाईल 9739600050