बेळगाव लाईव्ह :काकती येथील मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदाच्या निवडणुकीनंतर आज झालेल्या अध्यक्ष -उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत कारखान्याच्या नूतन अध्यक्षपदी तानाजीराव पाटील आणि उपाध्यक्षपदी आर. आय. पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
काकती येथील मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक आज सोमवारी सकाळी पार पडली. या निवडणुकीमध्ये कारखान्यावर सत्ता मिळवलेल्या शेतकरी बचाव पॅनलचे प्रमुख तानाजीराव पाटील आणि आर. आय. पाटील यांची नावे आघाडीवर होती. नूतन संचालकांना आज सकाळी 10 वाजता कारखान्यावर उपस्थित राहण्याची सूचना करण्यात आली होती. त्यानुसार सर्व संचालक उपस्थित झाल्यानंतर सकाळी 11 वाजल्यापासून अध्यक्ष -उपाध्यक्ष पदासाठीची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. मात्र प्रतिस्पर्धी उमेदवार नसल्यामुळे कारखान्याच्या नूतन अध्यक्षपदी तानाजीराव पाटील आणि उपाध्यक्षपदी आर. आय. पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केले.
निवडणुकीच्या निकालानंतर संचालक मंडळासमोर बोलताना उपाध्यक्ष आर. आय. पाटील म्हणाले की, ज्येष्ठ नेते दिवंगत रामभाऊ पोतदार यांनी बेळगाव परिसरातील शेतकऱ्यांचा आर्थिक कणा बळकट व्हावा यासाठी मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली. त्यानंतर गुरुअण्णा, शट्टूपाण्णा, माजी आमदार कै. बी. आय. पाटील, वाय. एस. पिंगट, अष्टेकर साहेब, यल्लाप्पा कांबळे यांनी कारखान्याच्या उभारणीत आणि कारखाना शेतकऱ्यांचा राहावा यासाठी मोलाचे प्रयत्न केले. त्यानंतर अलीकडच्या काळात अविनाश पोतदार आणि तानाजीराव पाटील यांनी गेल्या तीन वर्षापासून कारखान्याच्या गळीत हंगामाला सुरुवात केली. आता यापुढे देखील हा कारखाना शेतकऱ्यांच्या भल्यासाठी कार्यरत राहणार आहे. कारण शेतकऱ्यांचे भले झाले तरच कारखान्याचेही भले होणार आहे. यासाठी सर्वांकडून सहकार्याची अपेक्षा आहे. महत्त्वाची समस्या आर्थिक पाठबळाची आणि उसाची आहे. सध्या या दोन गोष्टींची कारखान्याला अत्यंत गरज आहे. त्यामुळे नूतन संचालकांसह सर्व सभासदांनी परिस्थिती लक्षात घेऊन या समस्येवर मात करण्यासाठी सहकार्य करावे. भविष्यात मार्कंडेय साखर कारखान्याला या भागातील एक नंबरचा कारखाना बनवावे आणि तसे निश्चितपणे होईल. आज माझ्यावर उपाध्यक्षपदाची धुरा माझ्यावर सोपवण्यात आली आहे, ती मी निश्चितपणे चांगल्या प्रकारे वाहीन अशी ग्वाही देतो. माझ्यावर विश्वास दाखविल्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे. सर्व सभासदांचे मी आभार मानतो असे सांगून नूतन अध्यक्ष तानाजीराव पाटील आणि मावळते अध्यक्ष अविनाश पोतदार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण कार्यरत राहू असे आर. आय. पाटील यांनी सांगितले. यासह शिवाजी सुंठकर,एस एल चौगुले पुंडलिक पावशे दीपक पावशे आर के पाटील आदींचे सहकार्य लाभल्यानेच इथपर्यंत पोचलो असेही त्यांनी म्हटले आहे.
मावळते अध्यक्ष अविनाश पोतदार यांनी निवडणूक सुरळीत पार पाडल्याबद्दल सर्वप्रथम निवडणूक अधिकाऱ्यांचे आभार मानले. त्यानंतर त्यांनी आपल्या नेहमीच्या खिलाडूवृत्तीनुसार संचालक पदाच्या निवडणुकीत निवडून आलेल्या सर्व नूतन संचालकांचे आणि त्यानंतर आज निवडून आलेल्या नूतन अध्यक्ष व उपाध्यक्षांचे अभिनंदन केले. आपले दिलखुलास विचार व्यक्त करताना पोतदार यांनी आता कारखान्याची जबाबदारी तुमच्या आमच्या सर्वांवर आहे असे सांगून सर्वात मुख्य म्हणजे टीमला कॅप्टन व व्हाईस कॅप्टन लागतोच. कॅप्टन कसा पाहिजे तो घट्टमुट्ट पाहिजे, चांगला पाहिजे, दूरदृष्टी असलेला पाहिजे. त्या अनुषंगाने आपण सर्वांनी तानाजी मीनाजी पाटील यांची अध्यक्षपदी निवड केली. त्यामुळे ते आजपासून आमचे कॅप्टन म्हणजे कर्णधार आहेत. त्यासाठी मी त्यांना सुयश चिंततो पाठिंबा दर्शवतो सर्वांनी चांगल्या विचारांनी काम करावे. हा कारखाना खूप मेहनतीने उभा झालेला आहे. त्याची वाटचाल उत्तरोत्तर प्रगतीच्या दिशेने होत राहो हीच माझी शुभेच्छा आहे.
सर्वांनी मिळून एकत्र बसून चांगल्या विचाराने हा साखर कारखाना चालवला तर देव निश्चितपणे आपल्या सोबत राहील. कारखान्यात समोरील अडचणी आणि घ्यावे लागणारे कष्ट यांची तुम्हाला हळूहळू कल्पना येत जाईल असे सांगून गाळप हंगाम जवळ येत चालला आहे. त्यामुळे आपण सर्वांनी त्याच्या तयारीला लागलं पाहिजे. कारखान्यात चालवणे एका माणसाचे काम नाही सर्वांनी एकजुटीने कार्य केले पाहिजे, असे मावळते अध्यक्ष अविनाश पोतदार यांनी स्पष्ट केले. तसेच त्यांनी नूतन अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचे पुष्पगुच्छ देऊन खास अभिनंदन केल्यानंतर मिठाईचे वाटप करण्यात आले.
सदर कार्यक्रमानंतर कार्यालयाबाहेर पडलेल्या नूतन अध्यक्ष तानाजीराव पाटील व उपाध्यक्ष आर. आर. पाटील यांच्यावर त्यांच्या समर्थक व हितचिंतकांनी अभिनंदनचा वर्षाव केला. कारखान्याच्या आजी-माजी संचालकांसह सर्वांनी उभयतांचे पुष्पहार घालून व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. संचालक मंडळाच्या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर शेतकरी बचाव पॅनलने सातत्याने बैठका घेऊन कारखाना सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींची पूर्तता करण्यास सुरुवात केली आहे आता अध्यक्ष -उपाध्यक्ष पदाची निवडणूक झाल्यामुळे मार्कंडेय साखर कारखाना सुरू करण्याच्या हालचालींना वेग येणार आहे.यावेळी बोलताना अध्यक्ष तानाजी पाटील यांनी सर्वांच्या सहकार्याने आपण कारखाना चालवू यासाठी सर्वांनी मिळून काम करण्याचे आश्वासन दिले.