केंद्र सरकार व राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत आयोजीत ‘स्वच्छता ही सेवा’ या कचरा मुक्त भारत अभियानाचा शुभारंभाचा कार्यक्रम आज शनिवारी बेळगाव महापालिकेमध्ये उत्साहात पार पडला.
महापालिका कार्यालयामध्ये महापौर शोभा सोमनाचे, उपमहापौर रेश्मा पाटील, बेळगाव उत्तरचे आमदार असिफ उर्फ राजू सेठ, सर्व नगरसेवक -नगरसेविका, महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी, महापालिकेतील अधिकारीवर्ग या सर्वांनी अभियानाच्या नामफलकावर स्वाक्षऱ्या करण्याद्वारे ‘स्वच्छता ही सेवा’ या कचरा मुक्त भारत अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.
सदर शुभारंभाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर प्रसिद्धी माध्यमांना माहिती देताना महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी म्हणाले की, केंद्र सरकार व राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वच्छता ही सेवा’ हे कचरा मुक्त भारत अभियान आज सप्टेंबर 15 तारखेपासून येत्या 2 ऑक्टोबरपर्यंत राबविले जाणार आहे. बेळगाव महापालिकेमध्ये आज या अभियानाचा उद्घाटन समारंभ पार पडला आहे.
आता उद्या रविवारी सकाळी 8 वाजता कोटेकेरी अर्थात किल्ला तलाव परिसरात येथे सर्व राजकीय नेते, प्रतिनिधी, विद्यार्थी -विद्यार्थिनी, एनजीओ, स्व-सहाय्य संघ, एनसीसी, एनएसएस, स्काऊट अँड गाईड्स यांच्या श्रमदानाने संयुक्त असे स्वच्छता अभियान राबविली जाणार आहे. त्याचप्रमाणे सफाई आणि सुरक्षा शिबिर येत्या 18 ते 25 सप्टेंबर पर्यंत आयोजित केले जाईल.
त्याचप्रमाणे येत्या 25 ते 30 सप्टेंबरपर्यंत ‘स्वच्छता ही सेवा’ अंतर्गत सार्वजनिक व व्यावसायिक ठिकाणी, धार्मिक स्थळांच्या ठिकाणी, शाळा महाविद्यालय आदी ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविली जाईल.
यावेळी केरकचरा काढणे, स्वच्छतागृहांची सफाई वगैरे स्वच्छतेची सर्व कामे केली जातील. त्यानंतर अखेर 1 आणि 2 ऑक्टोबर रोजी भव्य प्रमाणात स्वच्छता अभियान हाती घेतले जाणार आहे असे सांगून बेळगाव महानगरपालिकेच्या संपूर्ण कार्यक्षेत्रात राबविल्या जाणाऱ्या या अभियानामध्ये बेळगाव शहरातील समस्त जनतेने विशेष करून युवकांनी सहभागी होऊन अभियान यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन मनपा आयुक्त अशोक दूडगुंटी यांनी शेवटी केले.