बेळगाव लाईव्ह :हरी काका कंपाऊंड गांधीनगर येथील दुर्दशा झालेल्या रस्त्याची दुरुस्ती करण्याबरोबरच पथदीप व इतर समस्यांचे लवकरात लवकर निवारण केले जावे अशी मागणी हरी काका कंपाउंड येथील व्यावसायिकांनी एका निवेदनाद्वारे आमदार असिफ उर्फ राजू सेठ यांच्याकडे केली आहे.
हरी काका कंपाऊंड गांधीनगर येथील मोटार कामगार संघटनेच्यावतीने अध्यक्ष लक्ष्मण गोमानाचे आणि उपाध्यक्ष किरण मोदगेकर यांच्या नेतृत्वाखाली आज सोमवारी सकाळी आमदार असिफ सेठ यांची भेट घेऊन त्यांना उपरोक्त मागणीचे निवेदन सादर करण्यात आले.
गेल्या 14 वर्षांपासून हरी काका कंपाऊंड, गांधीनगर येथे ट्रक बॉडी बिल्डिंग व पेंटिंगचा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र अलीकडे कांही वर्षांपासून या भागातील व्यावसायिकांना वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. महापालिकेच्या प्रभाग क्र. 14 मध्ये येणाऱ्या हरी काका कंपाऊंडमधील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे.
तसेच या भागात पथदीप बसवावेत अशी मागणी देखील अनेकदा करण्यात आली आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असून पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या चिखलामुळे व्यावसायिकांना ये -जा करणे मुश्किल होते आहे. तसेच गोवा, महाराष्ट्र, तेलंगाना आदी भागातून आपल्या कामासाठी येणाऱ्या परगावच्या नागरिकांना देखील येथील समस्यांचा सामना करावा लागतो. येथील समस्या सोडाव्यात अशी मागणी मोटार कामगार संघटनेच्यावतीने अनेकदा लोकप्रतिनिधी व महापालिकेकडे करण्यात आली आहे. मात्र आजतागायत आश्वासन देण्यापलीकडे काही झालेले नाही.
तरी आपण गांभीर्याने लक्ष देऊन आमच्या भागातील समस्या सोडवाव्यात तसेच हरिकाका कंपाउंड ते जुन्या धारवाड रोडकडे जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे. निवेदन सादर करतेवेळी अध्यक्ष लक्ष्मण गोमानाचे व उपाध्यक्ष किरण मोदगेकर त्यांच्यासह रमेश मोदगेकर, कृष्णा पाटील, मारुती लोहार, नारायण भोगण, सतीश शेट्टी, वसंत पाटील आदी उपस्थित होते.