महाराष्ट्रातील सेंटर फॉर इक्विटी अँड क्वालिटी इन युनिव्हर्सल एज्युकेशन या बिगर सरकारी संस्थेमार्फत सरकारी शाळांमधील शिक्षकांसाठी आयोजित ‘टीचर इनोव्हेटर प्रोग्रॅम -2023’ या दोन दिवसाच्या शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमाला आज उत्साहात प्रारंभ झाला.
बेळगाव शहरात या शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन डायट प्राचार्य गोची यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी शहरातील सरकारी शाळांचे शिक्षक आणि शिक्षिका बहुसंख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमासंदर्भात बेळगाव लाईव्हला अधिक माहिती देताना संयोजिका उमा कोगेकर म्हणाल्या की, सदर कार्यक्रमाचे शीर्षक टीचर इनोव्हेटर प्रोग्रॅम असे आहे. हा कार्यक्रम सरकारी खात्यांच्या भागीदारीत 3 ते 5 वर्षे चालविला जातो. या कार्यक्रमाद्वारे सरकारी शाळांमधील शिक्षकांनी मुलांना शिकतं करण्यासाठी भाषा आणि गणितातल्या विविध पद्धती कशा वापरायच्या याबाबत मार्गदर्शन केले जाते. या कार्यक्रमांतर्गत शिक्षकांना नवनव्या शिक्षण पद्धती अवगत करून दिल्या जातात. ज्यांचा ते वर्गात जाऊन अवलंब करतात. याबरोबरच शिक्षकांच्या वर्गात जाऊन ते कसे शिकवत आहेत? त्यांना कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागते? याचे निरीक्षण करून त्यावर चर्चा केली जाते. त्यानंतर या कार्यक्रमांतर्गत मुलांना कांही छोटी शिकण्याची स्त्रोत आणि वर्कबुक्स दिली जातात. कार्यक्रमाच्या शेवटी म्हणजे शैक्षणिक वर्षाच्या शेवटी मुलं काय शिकली? हे पाहिलं जातं. त्याकरिता प्रदर्शनाच्या माध्यमातून मुलांना बोलतं केलं जातं.
ही प्रदर्शन शालेय स्तरावर तर कधी कधी तालुकास्तरावर आयोजित केली जातात. ज्यामुळे पालक, ग्रामपंचायत सदस्य, सरकारी खात्यांच्या प्रतिनिधींना मुलं काय शिकली? हे बघायला मिळत. स्वतः शिक्षकांना आपण ज्या पद्धती अवलंबिल्या त्यामुळे मुलं कशी शिकती झाली हे समजत. कारण प्रदर्शनामध्ये मुलं स्वतः ते बोलून दाखवतात.
सीखे ही संस्था गेली 11 वर्ष हे कार्य करत असून महाराष्ट्रातील 6 जिल्ह्यात तसेच मध्य प्रदेशातील 2 जिल्ह्यांमध्ये आमची संस्था कार्यरत आहे. सध्याच्या घडीला आम्ही सुमारे 2600 शिक्षकांसोबत काम करत आहोत आणि 35000 मुलांपर्यंत पोहोचत आहोत अशी माहिती देऊन या कार्यक्रमाचा बेळगावातील उगम हा जिल्हा पंचायत सीईओ हर्षल भोयर यांच्यामुळे झाला असल्याचे उमा कोगेकर यांनी स्पष्ट केले.