बेळगाव लाईव्ह:शिवबसवनगर येथील युवकाच्या खून प्रकरणाचा छडा लावण्यात माळमारुती पोलिसांना यश आले असून पोलिसांनी दोघा आरोपींना गजाआड केले आहे.एकूण तीन पैकी दोघांना घटनेच्या दोनच दिवसाच्या आत पोलिसांनी अटक करण्यात यश मिळवले आहे.
प्रथमेश धर्मेंद्र कसबेकर (वय 20, रा. राजारामपुरी गायछाप गल्ली कोल्हापूर) व आकाश कडप्पा पवार (वय 21, रा. राजाराम चौक) अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. बेळगाव शहरातील शिवबसवनगर भागात गेल्या 30 ऑगस्ट रोजी रात्रीच्या वेळी मोटर सायकलवरून आलेल्या तिघा युवकांपैकी एकाने पाठलाग करून रस्त्यावर चालत जाणाऱ्या नागराज इरप्पा गाडीवड्डर या युवकाचा डोक्यात दगड घालून खून केला होता.
याप्रकरणी माळ मारुती पोलिसांनी महाराष्ट्र पोलिसांच्या मदतीने काल शुक्रवारी उपरोक्त दोघा जणांना ताब्यात घेतले. पोलीस चौकशीत दोन्ही आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांची कारागृहात न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
सदर खून प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असलेल्या आरोपीला अटक करण्याची प्रक्रिया सुरू असून लवकरच त्याला देखील गजाआड करण्याचा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. नागराज गाडीवड्डर खून प्रकरणाचा अल्पावधीत छडा लावलेल्या माळमारुती पोलिसांना वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी बक्षीस जाहीर केले आहे.
पोलीस उपायुक्त शेखर यांनी सदर खुनाचा छडा लावण्यासाठी विशेष पथक स्थापन केले होते. या पथकाने तपास करत खून झालेल्या दोन दिवसातच या प्रकरणाचा छडा लावला आहे.
खुनाचे नेमके कारण काय? नागराज याच्या खून प्रेम प्रकरणातून झाला असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. नागराज याच्या प्रेमिकेला भेटायला कोल्हापूर हून युवक आले असता कोल्हापूर येथील युवक आणि नागराज यांच्यात या अगोदर मारामारी देखील झाली असल्याचे समोर आले आहे आणि त्या रागातूनच नागराजचा खून झाला असावा असाही कयास लावण्यात येत आहे.