बेळगाव लाईव्ह:सार्वजनिक शिक्षण खात्यातर्फे घेण्यात आलेल्या बेळगाव जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत बालिका आदर्श शाळेची विद्यार्थिनी आणि रयत गल्ली वडगाव येथील रहिवासी असलेल्या समिधा बिर्जे हिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
टिळकवाडीतील बालिका आदर्श विद्यालयांमध्ये इयत्ता सहावीत शिकणाऱ्या समिधा बिर्जे हिने जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत मुलींच्या 30 किलो वजनी गटामध्ये प्रथम क्रमांक पटकाविला आहे. आता राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाल्यामुळे तिचे सर्वत्र अभिनंदन, तसेच रयत गल्लीतील शेतकरी व नागरिकांमध्ये कौतुक होत आहे. तिला राष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक मारुती घाडी, उमेश बेळगुंदकर आणि शाळेच्या क्रीडा शिक्षकांचे मार्गदर्शन लाभत आहे.
रयत गल्ली वडगावला व्यायाम आणि कुस्तीची मोठी परंपरा आहे. शरीरसौष्ठव, कुस्ती, करेला स्पर्धा, वेटलिफ्टिंग, गाडी ओढण्याच्या शर्यतीबरोबर अनेक स्पर्धेतून येथील युवकांनी आपली कर्तबगारी दाखवत स्थानिक, जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय आणि देशपातळीवर रयत गल्लीचा ठसा उठवला आहे.
आता उदयोन्मुख मल्ल समिधा बिर्जे हीने अगदी लहान वयात कुस्तीमध्ये येवढे यश मिळवल्याने गल्लीतील प्रत्येकाला तिचा अभिमान वाटत असून भविष्यात तिच्याकडून याहीपेक्षा मोठ्या म्हणजे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील यशाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
फक्त शेतकरी कुळातच नव्हे तर हालगा-मच्छे बायपास अन्याय विरोधातल्या लढ्यात या मुलीसह पूर्ण कुटूंबाने झोकून देत आंदोलन केले होते.इतकेच काय तर समिधाच्या आईने आपली शेती कदापी देणार नाही म्हणून पोलिस फौजफाट्यासह आलेले शासकीय अधिकारी,महामार्ग ठेकेदाराना विरोध केला होता.
अधिकाऱ्यांनी त्यांच्या उभ्या पिकात जेसीबी घालतानां पाहून खवळलेल्या कुटुंबाने त्यात तिची आई समिधा देखील होती कडाडून विरोध केल्याने त्यांना महिला पोलिसांनी अटक केली अश्या संघर्षातून पुढे आलेल्या समिधाचे कौतुक करायला हवे असे मत शेतकरी नेते राजू मर्वे यांनी व्यक्त केले आहे.