बेळगाव लाईव्ह:मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी आठ दिवसांवर आलेल्या श्री गणेशोत्सवापूर्वी शहरातील गणेशोत्सव मंडळांना भेडसावणाऱ्या सर्व प्रकारच्या समस्या, अडचणी दूर कराव्यात अशी सूचना संबंधित खात्यांच्या अधिकाऱ्यांना केली आहे.
शहरातील सर्किट हाऊस येथे मध्यवर्तीय सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पालकमंत्री जारकीहोळी यांची भेट घेऊन चर्चा केली.
त्यावेळी चव्हाट गल्ली, भडकल गल्ली, शेट्टी गल्ली आणि जालगार गल्ली या चार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मूर्ती जुन्या जिल्हा पंचायत कार्यालयाकडून जातात. मात्र गेल्या कांही दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालय आवारात विविध प्रकारची विकास कामे हाती घेण्यात आली आहेत. या कामांमुळे गणेश विसर्जनात अडचणी येऊ शकते. त्यासाठी संबंधित कामे वेळेत पूर्ण केली जावीत.
महामंडळाच्या मागणीनुसार हेस्कॉनने विविध भागात दुरुस्तीची कामे हाती घेऊन पूर्ण केली आहेत. त्याचप्रमाणे इतर खात्यांनी देखील त्यांच्याशी निगडित कामे पूर्ण करावीत अशी विनंती महामंडळाच्या पदाधिकार्यांनी केली.
पदाधिकाऱ्यांनी मांडलेले मुद्दे पटल्यामुळे पालकमंत्र्यांनी सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळांना भेडसावणाऱ्या सर्व समस्या अडचणी त्वरेने दूर करण्याची सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केली. याप्रसंगी महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी, पोलीस उपायुक्त रोहन जगदीश, महामंडळाचे कार्याध्यक्ष रणजीत चव्हाण -पाटील, जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी, प्राचार्य आनंद आपटेकर आदींसह विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.