बेळगाव लाईव्ह :श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर इन्फिनिटी फिल्मस् प्रोडक्शन प्रस्तुत मच्छे, बेळगावची साडेतीन वर्षाची चिमुरडी बाल गायिका रूत्वी गजानन जैनोजी हिचा ‘माझा गणराया’ हा सर्वांचे मन जिंकणारा गाण्याचा अल्बम लवकरच बाजारात येत आहे.
मच्छे येथील व्यावसायिक गजानन जैनोजी यांची कन्या आणि सामाजिक कार्यकर्ते कृष्णा जैनोजी यांची नात असलेली रूत्वी सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय आहे. तिच्या गाण्यांना लाखो शेअर आणि व्ह्यू मिळत असतात.
राजहंसगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्याप्रसंगीचा तिचा व्हिडिओ पाहून छ. शिवाजी व छ. संभाजी महाराजांची भूमिका साकारणारे सुप्रसिद्ध अभिनेते खुद्द खासदार अमोल कोल्हे यांनी व्हिडिओ कॉल करून रूत्वीचे भरभरून कौतुक करत तिला आशीर्वाद दिले होते. अवघ्या दीड -दोन वर्षाची असताना राजकारण, चित्रपट वगैरे विविध क्षेत्रातील 150 दिग्गज व्यक्तींना ओळखण्याचा पराक्रम करणाऱ्या रूत्वी जैनोजी हिची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने देखील घेतली आहे.
श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आता अवघ्या साडेतीन वर्षाच्या रूत्वीचा ‘माझा गणराया’ या गाण्याचा अल्बम बाजारात येत आहे. या अल्बमचे प्रस्तुत करता इन्फिनिटी फिल्मस् प्रोडक्शन हे असून दिग्दर्शिका शिवानी बस्तवाडकर आणि निशांत भोईटे हे आहेत. अल्बमच्या सहाय्यक दिग्दर्शिका सृष्टी बडसकर आणि लेखक, रचनाकार व संगीतकार अनुप अरुण पवार हे आहेत.
बाल गायिका रूत्वी गजानन जैनोजी हिचा हा अल्बम निश्चितपणे सर्वांचे मन जिंकेल असा विश्वास इन्फिनिटी फिल्मस् प्रोडक्शनने व्यक्त केला आहे. येत्या एक-दोन दिवसात ‘माझा गणराया’ अल्बम प्रकाशित होत असून गणेश भक्तांनाही या अल्बमची प्रतीक्षा लागून राहिली आहे.