दरवर्षीप्रमाणे नार्वेकर गल्ली येथील श्री ज्योतिर्लिंग मंदिरामध्ये आज तिसऱ्या श्रावण सोमवार निमित्त लघुरुद्राभिषेकासह विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या भक्तीभावाने पार पडले. सदर मंदिरात साकारलेली 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक श्री केदारनाथ मंदिराची प्रतिकृती लक्षवेधी ठरत आहे.
श्रावणातील आजच्या तिसऱ्या सोमवारी नार्वेकर गल्ली येथील श्री ज्योतिर्लिंग मंदिरात देवदर्शनासाठी सकाळपासून दिवसभर भाविकांची गर्दी पहावयास मिळाली. मंदिरात सकाळी लघुरुद्राभिषेकासह विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.
सदर मंदिरात तिसऱ्या श्रावण सोमवार निमित्त 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री केदानाथ मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. त्यासंदर्भात बोलताना मंदिराच्या पुजाऱ्यांनी प्रथम आज मंदिरात झालेल्या विविध धार्मिक कार्यक्रमांची माहिती दिली. त्याचप्रमाणे गोरगरीब सर्वसामान्य भाविकांना देशातील 12 ज्योतिर्लिंगांचे दर्शन मिळणे अवघड असते.
हे लक्षात घेऊन दादा महाराज अष्टेकर यांच्या संकल्पनेनुसार आम्ही आमच्या मंदिरात त्या 12 ज्योतिर्लिंगांच्या प्रतिकृतींचे दर्शन घडवतो. त्यानुसार आजच्या तिसऱ्या श्रावण सोमवारी श्री केदारनाथ मंदिराचा देखावा सादर करण्यात आला आहे. भक्तांनी तीन दिवस मेहनत घेऊन हा देखावा उभारला आहे. या खेरीज दरवर्षी आम्ही आमच्या मंदिरात भाविकांना अमरनाथ येथील बर्फाचे शिवलिंग आणि श्री वैष्णव देवीचे दर्शन घडवितो, असे पुजाऱ्यांनी सांगितले.
सोमवारी दिवसभर देवदर्शन घेण्याबरोबरच श्री केदारनाथ मंदिराची प्रतिकृती पाहण्यासाठी नार्वेकर गल्ली श्री ज्योतिर्लिंग मंदिरात भाविकांची गर्दी होत आहे.