बेळगाव लाईव्ह :मोठमोठे खाचखळगे पडून धोकादायक बनलेल्या चोर्ला मार्गे बेळगाव -पणजी रस्त्याची युद्ध पातळीवर दुरुस्ती करून तो वाहतुकीसाठी सुरक्षित करावा, या मागणीसाठी कणकुंबी, पारवाड, आमटे, जांबोटी परिसरातील ग्रा. पं. पदाधिकारी व ग्रामस्थांनी आज सोमवारी सकाळी कणकुंबी येथे रास्ता रोको आंदोलन छेडले आहे.
या आंदोलनामुळे कणकुंबी येथे बेळगाव -पणजी मार्गावरील वाहतूक ठप्प होऊन चक्काजाम झाल्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागलेल्या पहावयास मिळत आहेत.
चोर्ला मार्गे बेळगाव -पणजी रस्त्याचे विकास काम त्वरित हाती घेण्यात यावे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांसह संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष येऊन गोव्याच्या सीमेपर्यंतच्या या रस्त्याची झालेली दुर्दशा पहावी. या मागणीसाठी कणकुंबी येथे पारवाड ग्रा. पं. अध्यक्ष भिकाजी अर्जुन गावडे यांच्यासह कणकुंबी, आमटे, जांबोटी ग्रा. पं. अध्यक्ष, सदस्य तसेच स्थानिक नेत्यांच्या नेतृत्वाखाली आज सोमवारी सकाळी 8:30 वाजल्यापासून बेळगाव -पणजी मार्गावर रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले आहे.
कणकुंबी, पारवाड, आमटे, जांबोटी परिसरातील ग्रामस्थांचा मोठा सहभाग असलेल्या या आंदोलनामुळे सकाळपासून या मार्गावरील वाहतूक ठप्प होऊन विस्कळीत झाली आहे. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला बस, ट्रक, कार वगैरे वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्याचे पहावयास मिळत आहे.
आपल्या आंदोलनासंदर्भात प्रसिद्धी माध्यमांना माहिती देताना एका आंदोलकाने सांगितले की, चोर्ला मार्गे बेळगाव -पणजी रस्ता गेल्या 2 वर्षापासून मोठ-मोठे खड्डे पडून खराब झाला आहे. परिणामी या मार्गावर सतत अपघाताच्या घटना घडत असतात रस्त्यावरील मोठमोठ्या खाचखळग्यातून आपली वाहने घेऊन जाताना वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. यासंदर्भात कंत्राटदार, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख वगैरेंना कल्पना देऊनही अद्याप कोणतीच कार्यवाही झालेली नाही. सदर रस्त्याच्या विकासासाठी म्हणजे फक्त खड्डे बुजवण्यासाठी 3 कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली आहे. तसेच या संपूर्ण रस्त्याचे राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 मध्ये रूपांतर करण्यासाठी 263 कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली आहे. मात्र अद्यापपर्यंत कणकुंबी, चोर्ला मार्गे जाणाऱ्या या रस्त्याचा विकास साधण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
सरकार प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज आम्ही हे आंदोलन करत आहोत. आम्ही या रस्त्याची युद्धपातळीवर दुरुस्ती केली जावी या मागणीचे निवेदन रस्त्यावरील खड्ड्यांच्या छायाचित्रांसह जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस प्रमुख संबंधित कंत्राटदार व अन्य अधिकाऱ्यांना देऊन 10 दिवस उलटले आहेत. त्याचप्रमाणे संबंधित सर्वांना त्या निवेदनाद्वारे आज सकाळी 8 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत केल्या जाणाऱ्या रस्ता रोको आंदोलनाची कल्पना देण्यात आली आहे. गोव्याला जाण्यासाठीचा हा शॉर्टकट रस्ता असून यामुळे 40 कि.मी. अंतर कमी होण्याबरोबरच आपल्याला 1 तास लवकर गोव्याला पोहोचता येते. याखेरीज हा रस्ता गोव्यातील वास्को व मोपा या दोन विमानतळांना जोडणारा आहे. या पद्धतीने गोव्याला जाण्यासाठी हा अत्यंत सोयीचा रस्ता असल्यामुळे त्याची युद्धपातळीवर दुरुस्ती होणे आवश्यक आहे. स्वतः जिल्हाधिकारी तसेच अन्य संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन गोवा सीमेपर्यंतच्या या रस्त्याची झालेली दुर्दशा पहावी अशी आमची मागणी आहे, असेही त्या आंदोलकाने सांगितले.
दरम्यान, कणकुंबी येथे सकाळी 8:30 वाजल्यापासून हाती घेण्यात आलेले रास्ता रोको आंदोलन दुपारी 12 वाजले तरी सुरूच होते. खानापूरचे तहसीलदार, खानापूर पोलीस निरीक्षक आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी किरण आदी आंदोलन स्थळी गेले आहेत. तथापि कणकुंबी आणि परिसरातील ग्रामस्थांनी आपले आंदोलन कायम ठेवले आहे. युद्धपातळीवर रस्ता दुरुस्त करण्याचे ठोस आश्वासन मिळाल्याखेरीज रास्ता रोको मागे घेतला जाणार नाही असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
परिणामी सदर रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाले असून अनेक वाहन चालकांना माघारी फिरवून अनमोड मार्गे गोव्याला जावे लागत आहे. त्याचप्रमाणे गोव्याकडून येणाऱ्या वाहन चालकांना पर्यायी मार्गाने बेळगावला पोहोचावे लागत आहे.