बेळगाव लाईव्ह:मराठा को-ऑपरेटिव्ह बँकेने 31 मार्च 2023 अखेर पर्यंतच्या अहवाल साली 2 कोटी 69 लाख रुपयांचा निव्वळ नफा कमवला असल्याची माहिती बँकेचे चेअरमन दिगंबर पवार यानी दिली.मराठा बँकेची 81 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि. 10 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 11 वा. मुख्य शाखा, बसवाण गल्ली, बेळगांव येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृह येथे आयोजित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या दि. 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 अखेर बँकेने केलेले आर्थिक व्यवहार व नवीन उपक्रमाची माहिती देताना चेअरमन पवार बोलत होते. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सन 2022 -23 सालात बँकेच्या एकूण ठेवी 181 कोटी 76 लाख इतक्या आहेत. सभासदांच्या ठेवी सुरक्षितेसाठी बँकेने 5 लाखापर्यत विमा उतरविलेला आहे. जेष्ठ नागरिकाना ठेवीवर 1/2 टक्के जादा व्याजदर देण्यात येत आहे. ठेवीवर एक वर्षाला 8.25 टक्के व्याज देत आहोत व या योजनेत ज्येष्ठ नागरिकाना ठेवीवर 25 टक्के जादा व्याजदर देत आहोत. बँकेने एकूण रु. 128 कोटी 4 लाख कर्ज वितरण केले आहे. कर्ज व्यवहार वाढविण्याकरिता बँकेने कर्जाचे व्याजदर समतोल ठेवलेले आहेत. गृह कर्ज 9.50 टक्के इएमआय, कार कर्ज 10 टक्के इएमआय, सामान्य कर्ज 11.00 टक्के इएमआय याप्रमाणे कर्ज वितरण केले आहे. बँकेचा ग्रॉस एनपीए 4.08 टक्के व नेट एनपीए 0 टक्के इतका आहे. सरकारी लेखा परिक्षणानुसार 2022 -23 साठी बँकेला ऑडीट वर्ग “अ” मिळालेला आहे. बँकेला यावर्षी निव्वळ नफा 2 कोटी 69 लाख झालेला आहे. सामाजिक उपक्रम राबवत बँकेने आर्थिकदृष्ट्या अग्रक्रम क्षेत्रास 75.61 टक्के व दुर्बल घटकास 44.75 टक्के कर्जाचे वितरण केले आहे.
ग्राहक सेवेस नेहमीच बँकेने प्राधान्य दिले आहे. उत्तम ग्राहक सेवेकरिता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब बँकेने केला असून गेल्या कांही वर्षात बँकिंग क्षेत्रात घडलेला महत्वाचा बदल म्हणजे बँकानी तंत्रज्ञानाची धरलेली कास हा होय, तंत्रज्ञानामुळे ग्राहकांना जलद सेवा उपलब्ध होत आहे. कोअर बँकिंग प्रणालीमुळे ग्राहकांना कोणत्याही शाखेतून व्यवहार करता येत आहेत. मराठा बँकेने आरटीजीएस /एनईएफटी, आयएमपीएस, एसएमएस, एटीएम सेवा सुरु केल्या असून मुख्य शाखेसह मार्केट यार्ड शाखा, नरगुंदकर भावे चौक शाखा व खानापूर रोड शाखेत स्वतःचे एटीएम मशीन सुरु केले आहे. मराठा बँक ग्राहकांना सुरक्षित डिजीटल बँकिंग सेवा प्रदान करण्यासाठी कटीबध्द आहे.
संचालक मंडळाने ‘अ’ वर्ग सभासदांना 15 टक्के व असोसिएट सभासदांना 8 टक्के डिव्हीडंड देण्याची शिफारस केली आहे. वय वर्षे 55 व सभासद होऊन 20 वर्षे झालेल्या सभासदांना वृद्धापकालीन सुविधा म्हणून 2500/- सहकार्य निधी देत आहोत. तसेच गतवर्षी बँकेचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला या निमित्ताने बँकेच्या सुरवातीपासून 2010 पर्यंतच्या सभासदांना रु.500/- , 2010 पासून 2015 पर्यंतच्या सभासदांना रु. 300/-, आणि 2015 पासून 31 मार्च 2020 पर्यतच्या सभासदांना रु.200/- चे बोनस शेअर (के. वाय. सी. ची पुर्तता करुन) देण्याचे जाहीर केले होते त्याचे वितरण चालू केले आहे.
सभासदांनी के. वाय. सी. ची पुर्तता करुन आपला बोनस शेअर जमा करुन घ्यावा. बँकेने चॅरिटी फंडातून परिसरातील अनेक शैक्षणिक संस्थाना भरीव आर्थिक मदत केली आहे. तसेच बेळगांव परिसरातील सामाजिक व विधायक कार्यात बँकेने सहकार्य केले आहे. विशेष सांगायचे म्हणजे गेल्या कांही वर्षापासून आम्ही शाखा विस्तार करण्याबाबत रिझर्व्ह बँकेकडे प्रयत्न करीत होतो. आत्ता आम्हाला नवीन तीन शाखा उघडण्याकरिता परवानगी मिळाली आहे. येत्या काही दिवसात लवकरच आम्ही गणेशपूर रोड, सांबरा रोड (एस. सी. मोटर्सच्या समोर) व खानापूर (बस स्टॅण्ड जवळ) शाखा सुरु करीत आहोत. नवे तंत्रज्ञान, नवीन विचार, नव्या कार्यप्रणाली यांचा अंगिकार करण्याला प्राधान्य देत बैंकिंग क्षेत्रातील तंत्रज्ञानाचा वेगाने होणारा विस्तार लक्षात घेता मराठा बँकेने ग्राहकांना तंत्रज्ञानाच्या आधारे सेवा देण्यावर भर दिला आहे असे स्पष्ट करून एकंदर आपली बँक नव्या प्रणाली स्विकारत आधुनिकतेकडे वाटचाल करीत आहे असे मराठा बँकेचे चेअरमन दिगंबर पवार यांनी सांगितले.