बेळगाव लाईव्ह :कर्नाटक राज्य प्राथमिक शाळा शिक्षक संघटनेतर्फे एनपीएस मागे घेऊन यूपीएस जारी करावा या मागणीसाठी भारत यात्रा काढण्यात आली आहे.
उद्या बेळगाव आगमन होणाऱ्या या यात्रेनिमित्त परवा 20 सप्टेंबर रोजी सकाळी शहरात बाईक रॅली काढण्यात येईल, अशी माहिती प्राथमिक शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष जयकुमार हेबळी यांनी दिली.
चव्हाट गल्ली येथील जिजामाता हायस्कूलमध्ये आज आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. सदर मोटरसायकल रॅली राणी कित्तूर चन्नम्मा सर्कल येथून केपीटीसीएल हॉलपर्यंत काढण्यात येणार आहे.
एनपीएस मागे घेऊन यूपीएस जारी करावा या मागणीसाठी एआयपीटीएफचे कार्याध्यक्ष बसवराज गुरुकार नेतृत्वाखाली गेल्या 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनी कन्याकुमारी येथून भारत यात्रेला प्रारंभ झाला आहे. केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा मार्गे काल या यात्रेचा कलबुर्गी येथे कर्नाटकात प्रवेश झाला आहे.
कलबुर्गी येथून ही यात्रा विजयपूर, चिक्कोडी मार्गे उद्या मंगळवारी 19 सप्टेंबर रोजी बेळगाव दाखल होईल. उद्या रात्री बेळगावात मुक्काम केल्यानंतर परवा बुधवारी 20 सप्टेंबर रोजी राणी कित्तूर चन्नम्मा सर्कल येथून केपीटीसीएल हॉलपर्यंत बाईक रॅली काढण्यात येईल.
रॅलीच्या समारोपानंतर त्या ठिकाणी सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर सभेला संघटनेचे राष्ट्रीय पातळीवरील नेते कर्नाटक राज्य प्राथमिक शाळा शिक्षक संघटनेचे राज्य अध्यक्ष, सरचिटणीस व इतर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे संघटनेचे बेळगाव जिल्हाध्यक्ष, उपाध्यक्ष सेक्रेटरी व इतर पदाधिकारी.
याखेरीज संघटनेच्या सर्व तालुका शाखा तसेच अन्य विविध कामगार संघटनांचे पदाधिकारी या सभेला उपस्थित राहणार आहेत असे सांगून मोटरसायकल रॅलीसह सभेचे आयोजन या सर्वांचे नेतृत्व बेळगाव जिल्हा प्राथमिक शाळा शिक्षक संघटना करणार आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष हेबळे यांनी दिली. याप्रसंगी शिक्षक संघटनेचे जिल्हा सरचिटणीस रमेश गोणी व इतर पदाधिकारी उपस्थित होते.