नैऋत्य रेल्वेकडून बेळगाव जिल्ह्यातील कुडची ते उगारखुर्द दरम्यानच्या नव्या दुपदरी रेल्वे मार्गाची गेल्या मंगळवारी सुरक्षा पाहणी करण्यात आली. रेल्वे सुरक्षा आयुक्त अनंत मधुकर चौधरी यांनी कुडची ते उगारखुर्द दरम्यानच्या 6.695 कि. मी. अंतराच्या दुपदरी रेल्वे मार्गाची वैधानिक तपासणी केली.
लोंढा ते मिरज दुपदरी रेल्वे मार्ग प्रकल्पाचा भाग असलेल्या कुडची -उगारखुर्द दरम्यानच्या रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाला गेल्या 2015 -16 साली मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पासाठीचा संपूर्ण निधी रेल्वे मंत्रालयाने पुरविला आहे. गेल्या मार्च 2023 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोंढ्यापासून घटप्रभा पर्यंतचा रेल्वे मार्ग राष्ट्राला समर्पित केला होता. नव्या दुपदरी रेल्वे मार्गामुळे त्यावर धावणाऱ्या रेल्वेची संख्या तर वाढणारच आहे, शिवाय रेल्वे सुरक्षा देखील वृद्धिंगत होणार आहे. ज्यादा रेल्वे गाड्या धावणार असल्यामुळे या मार्गावरील एक्सप्रेस रेल्वेची गरज दूर होण्याबरोबरच आपल्या मार्गावरील दुसऱ्या रेल्वेचे क्रॉसिंग होईपर्यंत पॅसेंजर रेल्वेना वाट पाहतही थांबावे लागणार नाही.
कुडची ते उगारखुर्द दरम्यानच्या नव्या दुपदरी रेल्वे मार्गावर कृष्णा नदीच्या ठिकाणी प्रमुख पूल असून याखेरीज कुडची येथे रिमोल्डिंग यार्डसह नवी लूप लाईन आणि 570 मी. लांबीचा प्रवासी प्लॅटफॉर्म आहे. या खेरीज या मार्गावर 60 मीटरचा रोड ओव्हर ब्रिज बांधण्यात आला आहे.
कुडची ते उगार खुर्द दरम्यान घेण्यात आलेली रेल्वेची वेग चांचणी डाऊन लाइन सर्वाधिक ताशी 119 कि.मी. आणि अप लाइन ताशी 89 कि.मी. इतकी नोंदविली गेली. रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी या मार्गावर ताशी 90 कि. मी. वेगाने रेल्वे चालविण्यास परवानगी दिली आहे. कुडची ते उगारखुर्द दरम्यानच्या रेल्वे मार्ग दुपदरीकरणासह नैऋत्य रेल्वेने 2023 -24 या आर्थिक वर्षात एकूण 25.1 कि.मी. अंतराच्या रेल्वे मार्ग दुपदरीकरणाचे काम केले आहे, अशी माहिती नैऋत्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क प्रमुख अनिष हेगडे यांनी दिली आहे.