बेळगाव लाईव्ह :कर्नाटक राज्य जलतरण संघटना मान्यता प्राप्त आबा स्पोर्ट्स क्लब आणि क्रीडा भारती बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मुला -मुलींच्या पहिल्या आंतरराज्य निमंत्रितांच्या डायव्हिंग स्पर्धेचे सर्वंकष सर्वसाधारण अजिंक्यपद सर्वाधिक 68 गुणांसह महाराष्ट्राने पटकाविले. कर्नाटकला 48 गुणांसह उपविजेते पदावर समाधान मानावे लागले. त्याचप्रमाणे मुला -मुलींच्या गटांचे सर्वसाधारण अजिंक्यपद देखील महाराष्ट्राने पटकावत कर्नाटकला द्वितीय स्थानावर ठेवले.
शहरातील गोवावेस येथील रोटरी -कार्पोरेशन जलतरण तलावामध्ये सलग दोन दिवस आयोजित सदर निमंत्रितांची डायव्हिंग स्पर्धा चुरशीच्या वातावरणात काल रविवारी यशस्वीरित्या पार पडली. सदर स्पर्धेच्या विविध गटांची वैयक्तिक अजिंक्यपदे शिवतेज माने, युवराज अंजीखाणे, वंशिका चुंगीवडियार, सोहम अदिनोल, आभा मलजी (सर्व महाराष्ट्र), तन्वी कारेकर, मयुरेश जाधव, ऋतुजा पवार (सर्व कर्नाटक) व यु. अभिषेक (तामिळनाडू) यांनी हस्तगत केली.
स्पर्धेत महाराष्ट्राच्या चमूने सर्वाधिक 42 गुणांसह मुलांच्या गटाचे विजेतेपद मिळविले. कर्नाटक 28 गुणांसह उपविजेता ठरला. त्याचप्रमाणे मुलींच्या गटात 26 गुणांसह महाराष्ट्राने जेतेपद मिळवत 20 गुणांसह कर्नाटकला द्वितीय स्थानावर ठेवले. सर्वांकष सर्वसाधारण अजिंक्यपदामध्ये तामिळनाडू अवघ्या 10 गुणांसह तिसऱ्या स्थानावर राहिला.
विविध गटातील वैयक्तिक अजिंक्य पद मिळावणारे यशस्वी ड्रायव्हर्स पुढील प्रमाणे आहेत. 12 वर्षाखालील मुले -शिवतेज माने (महाराष्ट्र), मुली -तन्वी कारेकर (कर्नाटक). 14 वर्षाखालील मुले -युवराज अंजीखाणे (महाराष्ट्र), मुली -वंशिका चुंगीवडियार (महाराष्ट्र),
17 वर्षाखालील मुले -सोहम आदीनाले (महाराष्ट्र), मुली -आभा मलजी (महाराष्ट्र). 19 वर्षाखालील मुले -मयुरेश जाधव (कर्नाटक). खुला पुरुष गट -यु. अभिषेक (तामिळनाडू), महिला गट -ऋतुजा पवार (कर्नाटक). एकंदर या आंतरराज्य निमंत्रितांच्या ड्रायव्हिंग स्पर्धेवर महाराष्ट्राच्या चमूने आपले वर्चस्व सिद्ध केले.
स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून मराठा मंदिराचे अध्यक्ष उद्योजक आप्पासाहेब गुरव, शक्ती गोल्डचे संचालक विनायक अर्कसाली, बीएसएनएलचे कार्यकारी अधिकारी सुहास निंबाळकर, अर्जुन पुरस्कार विजेते मुष्टीयोध्ये मुकुंद किल्लेकर, सायकलिंग प्रशिक्षक मोहन पत्तार, डायव्हिंग प्रशिक्षक श्रीकांत शेट्टे, आर. व्यंकटेश व एनआयएस जलतरण प्रशिक्षक विश्वास पवार उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते यशस्वी स्पर्धकांना आकर्षक ट्रॉफी, पदकं व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेसाठी पंच म्हणून विश्वास पवार, शिवराज मोहिते, निकिता पवार, अश्विनी मोहिते, कौस्तुभ पोटे (सर्व बेळगाव), श्रीकांत शेट्टे (सोलापूर), आर. व्यंकटेश (बेंगळूर), जगदीश मुद्देन्नावर, भारती कोठारी (हुबळी) यांनी काम पाहिले.
स्पर्धेसाठी परराज्यातून आलेल्या सर्व स्पर्धक व त्यांच्या पालकांची दोन्ही दिवस राहण्याची तसेच नाष्टा व जेवण यांची सोय आबा स्पोर्ट्स क्लब व क्रीडा भारतीतर्फे करण्यात आली होती. स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संदीप मोहिते, अमित जाधव, रणजीत पाटील, विशाल वेसणे, भरत पाटील, सुनील जाधव, सतीश धनुचे, वैभव खानोलकर, रमेश कुलकर्णी, विजय नाईक, प्रसाद दरवंदर, निखिल भेकणे, विजय भोगण, प्रांजल सुळधाळ, विशाल पाटील, भूषण पवार, शुभांगी मंगलोरकर, ज्योती पवार आदींनी विशेष परिश्रम घेतले.