बेळगाव लाईव्ह :एखादा साखर कारखाना चालवणे ही सोपी गोष्ट नाही. तो चालवताना मोठ्या अडथळ्यांना सामोरे जावे लागते. त्यासाठी महाराष्ट्रातील नामवंत सहकारी साखर कारखान्यांनी कशा प्रकारे नियोजन केले आहे, याचा अभ्यास मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने करावा, असे आवाहन पुणे येथील वसंतदादा पाटील शुगर इन्स्टिट्यूटचे माजी शास्त्रज्ञ सुरेशराव माने -पाटील यांनी केले.
काकती येथील मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याच्यावतीने मंगळवारी दुपारी मराठा मंदिर गोवावेस येथे ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आयोजित शेतकरी मेळावा उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला. याप्रसंगी प्रमुख वक्ते या नात्याने मार्गदर्शन करताना शास्त्रज्ञ सुरेशराव माने -पाटील बोलत होते.
ते म्हणाले की, पारंपारिक ऊस उत्पादनाला आधुनिक वैज्ञानिक पद्धतीची जोड देऊन साडेतीन-चार फूट उंचीच्या उसाचे पीक घेतले जावे. उसाची लागवड करताना प्रत्येक ऊसाला थेट स्वच्छ सूर्यप्रकाश मिळेल याची दक्षता घेतली जावी. ज्यामुळे ऊस दर्जेदार होतो. उसाचे पीक भरघोस येण्यासाठी मान्यताप्राप्त चांगल्या खताचा योग्य प्रमाणात योग्य प्रकारे वापर केला गेला पाहिजे. साखर कारखाना कसा चालवावा आणि उसाचे भरघोस पिक कसे घ्यावे याबद्दलही त्यांनी मुद्देसूद मार्गदर्शन केले. पूर्वीसारखे निश्चित न राहता अलीकडे हवामानात सतत बदल होत असून त्यामुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी शेतकऱ्यांनी सज्ज राहिले पाहिजे. तसेच उसाचे भरघोस उत्पादन घेण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. याबाबतीत चंदगड, कोल्हापूर भागात अनेक चांगले अनुभवी शेतकरी आहेत, जे 80 ते 100 टन उसाचे उत्पादन करतात. या शेतकऱ्यांना भेटून बेळगाव परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांचे मार्गदर्शन घ्यावे आणि आपली ऊस उत्पादन क्षमता वाढवावी असे आवाहन करून सुरेशराव माने -पाटील यांनी देशाच्या विविध भागातील ऊस उत्पादनाबद्दल माहिती दिली. तसेच देशात एकरी सर्वाधिक ऊस उत्पादन तामिळनाडू राज्यात होत असल्याचे त्यांनी स्पष्ट करताना त्या ठिकाणी प्रति एकर 42 टनापर्यंत ऊस उत्पादन केले जाते. त्या तुलनेत महाराष्ट्रामध्ये प्रति एकर 34 ते 35 टन तर कर्नाटकात तेच उत्पादन 38 टनापर्यंत जाते असे सांगितले. बेळगाव परिसरातील वातावरण ऊस उत्पादनासाठी अत्यंत पोषक असून त्याचा पुरेपूर लाभ शेतकरी बांधवांनी करून घ्यावयास हवा असे सांगून उसाची लागवड केंव्हा? व कशी? करावी याबाबत शास्त्रज्ञ माने -पाटील यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना ज्येष्ठ संचालक आर. आय. पाटील म्हणाले की, आर्थिक भांडवल जमा करण्यास सर्वांनी आम्हाला सहकार्य करावे. तसेच या परिसरातील शेतकऱ्यांनी आपला ऊस आमच्या कारखान्याला द्यावा. बँकांनीही आम्हाला सहकार्य करावे. मार्कंडेय साखर कारखान्याची निवडणूक होऊ नये यासाठी आमचे प्रयत्न होते. निवडणुकीसाठी आम्हाला सर्व सभासदांपर्यंत पोहोचता आले नाही. तरीही त्यांनी आमच्या पॅनलला विजयी केल्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. कारखान्याची अधिकाधिक भरभराट होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगून यासाठी सर्वांकडून आम्हाला सहकार्याची अपेक्षा असल्याचे आर. आय. पाटील यांनी सांगितले.
आर. के. पाटील यांनी यावेळी बोलताना मार्कंडेय साखर कारखाना सुरळीत चालण्यासाठी आर्थिक भांडवल मोठ्या प्रमाणात उभारावे लागणार असल्याचे स्पष्ट केले. त्याचप्रमाणे गेल्या वर्षी उसाची आवक कमी असल्यामुळे गळीत हंगाम लवकर थांबवावा लागला. तेंव्हा यंदा शेतकऱ्यांनी कारखान्याला जास्तीत जास्त घालावा असे आवाहन केले. यावेळी माजी महापौर शिवाजी सुंठकर सह जेष्ठ संचालकांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन पर आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुंडलिक पावशे आणि शिवाजी शिंदे यांनी केले. शेतकरी मेळाव्यास कारखान्याच्या हितचिंतकांसह सर्व आजी-माजी संचालक आणि बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.यावेळी विद्यमान संचालक सुनील अष्टेकर , अंबोळकर, शिवाजी कुट्रे बसवराज गानगेर, बाळासाहेब भेकने, लक्ष्मण नाईक,वनिता अगसगेकर,वसुधा म्हाळोजी, बाबासाहेब पाटील, बसवंत मायानाचे युवराज हुलजी, मराठा बँकेचे दिगंबर पवार आदी आजी माजी सदस्य हजर होते.