बेळगाव लाईव्ह :आपल्या ऑटो ॲम्बुलन्सच्या माध्यमातून आरोग्य सेवा आणि वैद्यकीय सहाय्यासाठी सुप्रसिद्ध असलेले बेळगावचे रहिवासी मंजुनाथ निंगाप्पा पुजारी यांना टाईम्स नाऊ या भारतातील आघाडीच्या इंग्रजी वृत्तवाहिनीने आरोग्य सेवा श्रेणीतील प्रतिष्ठेच्या ‘टाइम्स नाऊ अमेझिंग इंडियन्स अवॉर्ड’ या पुरस्काराने सन्मानित केले आहे.
टाईम्स नाऊ वाहिनीकडून हा पुरस्कार देण्याचा उद्देश आपल्या उल्लेखनीय कार्याद्वारे समाजावर लक्षणीय छाप पाडणाऱ्या सर्वसामान्य व्यक्तींना प्रकाशात आणणे हा आहे. बेळगावच्या मंजुनाथ पुजारी यांचे कार्य खरोखर प्रेरणादायी आहे. ते दिवसा ऑटोरिक्षा चालक म्हणून काम करतात. परंतु त्यांची सेवा ही प्रवासी वाहतूक करण्यापलीकडची असते. सायंकाळी 6 ते सकाळी 9 वाजेपर्यंत त्यांची ऑटोरिक्षा रुग्णवाहिकेमध्ये रूपांतरित झालेली असते.
आणीबाणीची परिस्थिती असलेल्या, तातडीने उपचाराची गरज असलेल्या रुग्णांना विशेष करून आश्रय फाउंडेशनसाठी पुजारी यांची ही ऑटो ॲम्बुलन्स मोफत उपलब्ध असते. अवेळी रात्री-अपरात्री ते मदतीचा हात देण्यास कायम तयार असतात. याबरोबरच पुजारी आपल्या कमाईचा काही भाग निवारा केंद्रातील गरजूंसाठी खर्च करतात.
या पद्धतीने निस्वार्थ सेवा करण्याची प्रेरणा मंजुनाथ यांना एका दुःखद घटनेपासून मिळाली. आपल्या शेजारी राहणाऱ्या एका गर्भवती महिलेला हॉस्पिटलला नेण्याकरिता ऑटो रिक्षाची सोय करण्यासाठी तिच्या कुटुंबीयांनी केलेली धडपड आणि हॉस्पिटलला पोहोचेपर्यंत त्या महिलेचा झालेला दुर्दैवी मृत्यू ही घटना पुजारी यांच्या मनाला चटका लावून गेली.
त्या महिलेप्रमाणे एखाद्या गरजू रुग्णाची परवड होऊ नये, त्याचे नशीब त्या गर्भवती महिलेप्रमाणे असू नये या विचाराने त्यांना आपल्या ऑटोरिक्षाचे रुग्णवाहिकेत रूपांतर करण्यास भाग पाडले. रुग्णांना हॉस्पिटल पर्यंत पोहोचवण्याद्वारे आपण त्यांचे जीवन फक्त सुकरच करत नाही तर एकंदर समाजासाठी आपण काहीतरी योगदान देत आहोत असे मंजुनाथ पुजारी यांना वाटते. गरजूला मदत करण्याची इच्छा आणि नम्रता यामुळे मंजुनाथ इतरांपेक्षा वेगळे आहेत.
एखाद्याने हॉस्पिटलला जाण्यासाठी ऑटोरिक्षाची विचारणा केली तर त्या व्यक्तीची वाईट वेळ लक्षात घेऊन अशा व्यक्तींकडे ते कधीच भाड्याच्या पैशासाठी आग्रह धरत नाहीत. उलट अडचणीत सापडलेल्या एखाद्याला मदत करण्याचे भाग्य आपल्याला लाभत आहे अशी भावना त्यांच्या मनात असते. कोरोना प्रादुर्भाव काळात पुजारी यांनी अनेक रुग्णांना हॉस्पिटलपर्यंत पोहोचविण्याचे कार्य नि:शुल्क केले आहे.
समाजसेवेच्या बाबतीतील मंजुनाथ नागाप्पा पुजारी यांची समर्पण वृत्ती खरोखर प्रशंसनीय आहे. त्यांच्या ऑटो ॲम्बुलन्सने अनेकांच्या जीवनावर निःसंशय लक्षणीय छाप सोडली आहे. थोडक्यात मंजुनाथ पुजारी हे करुणा आणि नि:स्वार्थीपणाचे मूर्तिमंत उदाहरण आहेत.