बेळगाव लाईव्ह :बेळगावच्या खासदार मंगला अंगडी यांनी आपले मौनव्रत सोडत प्रसिद्धी माध्यमांसमोर बोलताना येत्या लोकसभा निवडणुकीसाठी आपण बेळगाव लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटासाठी इच्छुक असल्याचे जाहीर करून सर्वांना धक्का दिला आहे.
शहरात पत्रकारांशी बोलताना खासदार मंगला अंगडी यांनी उपरोक्त माहिती देण्याद्वारे उलट सुलट सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. लोकसभा निवडणूक जवळ येत चालली असल्यामुळे बेळगाव लोकसभा मतदार संघामधून अनेक जण भाजपचे तिकीट अर्थात उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुक असताना आता खासदार अंगडी यांनी यावेळची उमेदवारी देखील आपल्यालाच मिळणार असा विश्वास व्यक्त केला आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मला उमेदवारी मागावी लागणार नाही. कारण सध्याची विद्यमान खासदार मीच असल्यामुळे उमेदवारी माझ्याकडेच राहणार आहे असेही त्यांनी सांगितले. मुलीला भाजपचे तिकीट मिळवून देण्याचा विचार आहे का? या प्रश्नाला उत्तर देताना सध्या तरी तसा काही विचार नाही. पुढे कशी परिस्थिती निर्माण होते ते पाहू असे त्या म्हणाल्या.
काँग्रेस पक्षात जाण्याचा विचार आहे का? या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी काँग्रेसचे तिकीट मिळाले तरी मी भारतीय जनता पक्ष कदापी सोडणार नाही. त्याचप्रमाणे भाजपचे तिकीट इतर कोणाला मिळाले तरी मी पक्ष त्याग करणार नाही.
या खेरीज आगामी लोकसभा निवडणुकीसाठी बेळगाव मतदार संघातील भाजपच्या तिकिटाबद्दल आमच्या वरिष्ठ नेत्यांनीही माझ्याशी चर्चा केलेली नाही असे खासदार मंगला अंगडी यांनी स्पष्ट केले. कुटुंबातील इतर कोणाला तिकीट मिळेल का? याबद्दल बोलताना बघूया त्याबद्दल विचार करून सांगेन. वरिष्ठ नेते काय निर्णय घेतात ते पहावे लागेल, असेही खासदार अंगडी म्हणाल्या.