Saturday, December 28, 2024

/

स्कूल बॅग हलकी करणारे रिफायलेबल प्रवीण मल्टीसब्जेक्ट नोटबुक

 belgaum

बेळगाव लाईव्ह :चिकोडी (जि. बेळगाव) येथील प्रवीण एस. के. या समर्पित हाडाच्या शिक्षकाने मोठ्या कल्पकतेने अजान लहान मुलांच्या स्कूल बॅग्जचे ओझे कमी करण्याचा उपाय शोधून काढला आहे. शालेय मुलांच्या पाठीवरील स्कूल बॅगचे ओझे कमी करणाऱ्या ‘रिफायलेबल प्रवीण मल्टीसब्जेक्ट नोटबुक्स’ची निर्मिती केली आहे.

पाठीवर स्कूल बॅगचे ओझे घेऊन शाळेला ये -जा करणाऱ्या विद्यार्थ्यांची दमछाक त्यांची केविलवाणी अवस्था लक्षात घेऊन प्रवीण एस. के. यांनी स्कूल बॅगांचे ओझे कमी करण्याच्या दृष्टीने कामाला सुरुवात केली. विविध स्कूल बॅगांच्या वजनांचे काळजीपूर्वक दस्तऐवजीकरण आणि मुले पालक व शिक्षकांची मते विचारात घेऊन विस्तृत संशोधनाअंती प्रवीण यांच्या लक्षात आले की कांही स्कूल बॅगांचे वजन मुलांच्या शरीराच्या वजनाच्या 20 ते 30 टक्के इतके असते.

तेंव्हा त्यांनी त्यावर उपाय शोधण्याचा निर्धार केला आणि विविध डिझाईन्स, साहित्य व बाइंडिंग पद्धतींचा अवलंब करून प्रयोग करण्यास सुरुवात केली अखेर जवळपास वर्षभराच्या अथक प्रयत्नानंतर प्रवीण यांनी यशस्वीरित्या नाविन्यपूर्ण अशी रिफायलेबल मल्टी सब्जेक्ट नोटबुक्सची निर्मिती केली. ज्या सध्या ‘प्रवीण नोटबुक्स’ म्हणून ओळखल्या जातात.

या नोटबुक्स म्हणजे नेहमीच्या सर्वसामान्य फोल्डरसह फाइल्स असलेल्या नोटबुक्स नाहीत तर त्यांना एक अद्वितीय क्लिप आहे. जी सहा भागात विभागल्या गेलेल्या कोऱ्या कागदांना एकत्र सुरक्षित धरून ठेवते.Lighten school bag

या नोटबुकवर विद्यार्थी पान संपेपर्यंत लिहू शकतात आणि त्यानंतर सहजपणे ते पान बदलून नव्या पानावर लिहू शकतात. शैक्षणिक वर्षाच्या अखेरीस हे नोटबुक्स सहा स्वतंत्र नोटबुक्समध्ये परिवर्तित करता येऊ शकते किंवा तत्सम समान फाईलमध्ये बद्ध करता येते. एकंदर शिक्षक प्रवीण एस. के. यांनी तयार केलेले हे नोटबुक्स स्कूल बॅगचे ओझे कमी करून शालेय विद्यार्थ्यांना दिलासा देणारे आहे.

बेळगाव शहरातील डेस्टिनी करियर कोचिंग क्लासेसचे संस्थापक असलेले प्रवीण गेल्या अनेक दशकांपासून विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करत आहेत. याचबरोबर शालेय मुला -मुलींसाठी ते निस्वार्थ वृत्तीने व्यक्तिमत्व विकास आणि इतर हितावह वर्गही विनाशुल्क घेत असतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.