बेळगाव लाईव्ह :यापूर्वी असंख्य जनावरांचा बळी घेणाऱ्या लंपी रोगाचा बेळगाव जिल्ह्यात पुन्हा शिरकाव झाला असून जिल्ह्यातील कांही जनावरांमध्ये त्याची लक्षणे दिसून आल्यामुळे पशुवैद्यकीय खाते सतर्क झाले आहे. दुसरीकडे यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे
बेळगाव जिल्ह्यातील कांही जनावरांमध्ये पुन्हा लंबी रोगाची लक्षणे दिसू लागली आहेत. त्यामुळे त्या जनावरांपैकी 12 जनावरांच्या रक्ताचे व लाळेचे नमुने बेंगलोर येथील प्रयोग शाळेत पाठविण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील जनावरांमध्ये लंपी रोगाची लागण झाली आहे. त्यामुळे सीमा भागातील शेतकरीवर्ग चिंतित झाला आहे. तथापि सतर्क झालेल्या पशुवैद्यकीय खात्याने महाराष्ट्रातून बेळगाव जिल्ह्यात कोणतीही जनावरे आणण्यात येऊ नयेत यासाठी सीमा भागातील विविध तपासणी नाकावर खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे.
बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी, गोकाक, रायबाग आणि अन्य तालुक्यातील जनावरांच्या रक्तांचे नमुने बंगळूर येथील प्रयोगशाळेत धाडण्यात आले आहेत.
खबरदारीची उपायोजना म्हणून जिल्ह्यात ठिकठिकाणी भरणाऱ्या जनावरांच्या बाजारावर निर्बंध घालण्यात आले आहेत. लंपीचा फैलाव होण्याच्या शक्यतेने पूर्वखबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
याखेरीज सध्या अन्य राज्यातून आलेल्या कांही जनावरांचे लसीकरण करण्यात येत आहे. त्यासाठी 2 लाख लसींचा संग्रह करण्यात आला आहे. ग्रामपंचायतींद्वारे ग्रामीण ग्रामीण भागातील शेतकऱ्यांमध्ये लंपी रोगाबाबत जागृती करण्यात येत आहे. तसेच आवश्यक ठिकाणी फॉगिंग करण्याची सूचना करण्यात आली आहे.
आता बेंगलोरच्या प्रयोगशाळेला पाठविण्यात आलेल्या नमुन्यांचे अहवाल आल्यानंतर पशुवैद्यकीय खात्याकडून पुढील उपाययोजना हाती घेतल्या जाणार असल्याची माहिती पशुवैद्यकीय खाते बेळगावचे उपसंचालक राजीव कोलेर यांनी दिली आहे.