Sunday, January 26, 2025

/

जाफरवाडीची भावना बीएसएफ मध्ये होणार दाखल

 belgaum

बेळगाव लाईव्ह: लोकं म्हणतात मुलगा झाला तर देशाच्या सेवेसाठी द्यावा तर घर पावते. जाफरवाडी येथील कृष्णा गौंडाडकर यांना चार मुलीचं.. मुलींनाच त्यांनी मुलगा मानल आणि देशाच्या संरक्षणासाठी वीरांगना बनवून त्यांची जेष्ठ मुलगी भावना देशाच्या सीमेचे संरक्षण करण्यासाठी निघाली आहे.

गौंडाडकर कुटुंबीयांचा उचंबळणारा आवेग डोळ्याच्या ओळवणाऱ्या कडा या भावनाच्या कर्तव्याचा आड येत नाही कारण हे कुटुंबच निघाले देश प्रेमाच्या आगीतून तावून सुलाखून. बैलाच्या खुरात शिवाराच्या सारित आणि बांदा बांदा वर राबणाऱ्या कृष्णा गौंडाडकर यांना माहिती आहे सृजनशीलतेचं महत्त्व.धाकट्या तीन बहिणीच्या पुढे आदर्श ठेवत भावना ने जो देशप्रेमाचा वसा घालून दिला आहे हा एक नवा वास्तू पाठ आहे.

जाफरवाडी (ता. जि. बेळगाव) गावची सुकन्या भावना कृष्णा गौंडाडकर हिची भारतीय सीमा सुरक्षा दलामध्ये (बीएसएफ) निवड झाली असून पुढच्या महिन्यात पश्चिम बंगाल मध्ये तिचे प्रशिक्षण सुरू होणार आहे.

 belgaum

भावना हिचे वडील कृष्णा गौंडाडकर हे शेतकरी असून आई गृहिणी आहे. गौंडाडकर दांम्पत्याच्या चार मुलींपैकी एक असलेल्या भावना हिचे शालेय शिक्षण जिजामाता शाळेमध्ये झाले. एसएसएलसी परीक्षेत या शाळेमधून 78 टक्के गुण मिळवून ती उत्तीर्ण झाली. आपले पदवी पूर्व शिक्षण मराठा मंडळ विज्ञान महाविद्यालयात पूर्ण करणारी भावना गौंडाडकर सध्या जीएसएस महाविद्यालयामधील बीएससी चतुर्थ सेमिस्टरची विद्यार्थिनी आहे. हुशार विद्यार्थिनी असण्याबरोबरच भावना ही एक उत्तम कराटेपटूही आहे. आतापर्यंत तिची तीन वेळा जिल्हास्तरीय आणि दोन वेळा राज्यस्तरीय कराटे स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तिला कराटे प्रशिक्षक नागेश पाटील यांचे मार्गदर्शन लाभत आहे.याशिवाय  तिने एनसीसीचे सी सर्टिफिकेट मिळवले आहे.

Bhavna bsf

लहानपणापासून लष्कराबाबत आकर्षण असलेल्या भावना गौंडाडकर हिने गेल्या दोन वर्षापासून देशाच्या संरक्षण दलात भरती होण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली होती. यासाठी तिने सैन्य दलात भरती होण्यासाठी युवा पिढीला मार्गदर्शन करून प्रशिक्षण देणाऱ्या क्लब रोड बेळगाव येथील एसजी आर्मी कोचिंग सेंटर नांव नोंदवून तयारी सुरू केली होती. सीपीएड मैदानावर ती दररोज सकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत कसून सराव करायची. तिच्या या तयारीला गेल्या ऑगस्टमध्ये बेंगलोर येथे झालेल्या भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या भरती प्रक्रियेत यश आले आणि तिची बीएसएफमध्ये निवड झाल्याचे पत्र नुकतेच तिच्या हाती आले. बीएसएफ मधील निवडीसाठी भावना गौंडाडकर हिला एसजी आर्मी कोचिंग सेंटरचे प्रमुख प्रशांत शहापूरकर, श्वेता पाटील, सौम्या होसळ्ळी व प्रांजन शहापूरकर यांचे मार्गदर्शन आणि आई-वडिलांचे प्रोत्साहन लाभत आहे. बीएसएफ मधील निवडीबद्दल ‘भावना’चे जाफरवाडी गावात सर्वत्र अभिनंदन होत आहे.Prashant shahapurkar

बेळगावातून अनेक रणरागिणी भावनाच्या मार्गाने जातील आणि महिला शक्ति किती दृढ आहे याचं दर्शन घडवतील. व्हिएतनामी महिला सैनिकांच्या कर्तृत्वाचे कौतुक जगभर होते त्याही पुढच्या पातळीवर भारतीय महिला सैनिक आहेत हे जगभर ज्यावेळी समजेल त्यावेळी भारताचा दरारा अधिकच वाढलेला असेल या महिला शक्तीला टीम बेळगाव लाईव्ह कडून शुभेच्छा!

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.