बेळगाव लाईव्ह: येथील आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) च्या वतीने दिनांक सहा व 7 सप्टेंबर 2023 रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जात आहे. त्यानिमित्त 1 सप्टेंबर पासून श्री श्री राधा गोकुलानंद मंदिरात रोज सायंकाळी सात ते साडेआठ वाजेपर्यंत परमपूज्य भक्ती रसामृत स्वामी महाराज यांचे कृष्ण कथा कथन होत आहे .
जन्माष्टमी निमित्त मंदिर परिसरात भव्य मंडप उभारण्यात आले असून बुधवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी दिवसभर मंदिर दर्शनासाठी खुले राहील. सायंकाळी साडेपाच ते साडेसहा पर्यंत अभिषेक होणार असून त्यानंतर गौर आरती व नृसिंह आरती होईल. रात्री साडेआठ वाजता भक्ती रसामृत स्वामी महाराजांचे विशेष प्रवचन होणार असून त्यानंतर सर्वांसाठी प्रसादाची सोय करण्यात आली आहे.
गुरुवार दि 7 सप्टेंबर हा जन्माष्टमीचा मुख्य दिवस असून त्या दिवशी सकाळी साडेचार ते नऊ पर्यंत मंगल आरती, जप, गुरुपूजा व कृष्ण कथा होईल. दिवसभर मंदिरात भजन व कीर्तन चालू राहील. सायंकाळी साडेपाच ते साडेसहा आणि त्यानंतर रात्री नऊ वाजेपर्यंत अभिषेक, साडेनऊ ते अकरा वाजेपर्यंत नाट्यलीला, अकरा ते बारा वाजेपर्यंत पुन्हा परमपूज्य भक्तीरसामृत स्वामी महाराजांची कृष्ण कथा, मध्यरात्री बारा वाजता श्रीकृष्ण जन्माचा सोहळा आणि त्यानंतर सर्वांसाठी महाप्रसाद असा कार्यक्रम आहे.
*8 सप्टेंबरला प्रभुपाद अविर्भाव दिन*
इस्कॉन चे संस्थापक श्रील प्रभुपाद यांचा जन्मदिवस जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 8 सप्टेंबरला येत असल्याने त्याही दिवशी सकाळच्या अर्ध्या दिवसात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या सर्व कार्यक्रमात भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन इस्कॉनच्या वतीने करण्यात आले आहे