Tuesday, January 7, 2025

/

हेस्कॉमकडून अडथळा ठरणाऱ्या इलेक्ट्रिक खांबांचे उच्चाटन

 belgaum

बेळगाव लाईव्ह :श्री गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्तीय सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाने केलेल्या पाठपुराव्याची पोचपावती आणि बेळगाव लाईव्हच्या बातमीचा इम्पॅक्ट म्हणजे धर्मवीर संभाजी महाराज चौक येथील रहदारीस अडथळा ठरणाऱ्या जुन्या इलेक्ट्रिक खांबासह किर्लोस्कर रोडवरील एकूण सहा खांब आज सोमवारी हेस्कॉमकडून युद्धपातळीवर हटविण्यात आले.

हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांनी आज स्वतः जातीने धर्मवीर महाराज संभाजी चौक येथे उपस्थित राहून जेसीबीच्या सहाय्याने युद्धपातळीवर केळकर बाग रोड कॉर्नर वरील जुना इलेक्ट्रिकचा खांब तसेच या ठिकाणचे रहदारीस अडथळा ठरणारे अन्य पाच खांब हटविले.

गणेश विसर्जन मिरवणुकीचा धर्मवीर संभाजी चौक किर्लोस्कर रोड हा मुख्य मार्ग असल्यामुळे केळकर बाग रोड कॉर्नर वरील खांब मिरवणुकीस अडथळा ठरणारा होता. सदर खाब हटविण्यात यावा यासाठी मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी हेस्कॉमकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता. त्याचप्रमाणे बेळगाव लाईव्ह देखील या संदर्भातील वृत्त गेल्या 20 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केले होते.

त्याची दखल घेत हेस्कॉमने अनंत चतुर्दशीच्या तीन दिवस आधी आज सोमवारी सकाळी युद्ध पातळीवर संबंधित खांब हटविण्याचे काम हाती घेतले होते. यासाठी हेस्कॉमचे अधिकारी ट्रक, जेसीबी आणि कामगारांच्या ताफ्यासह धर्मवीर संभाजी महाराज चौकात दाखल झाले होते.Hescom

जेसीबीचे सहाय्य घेत दोरखंड बांधून भर रहदारीच्या ठिकाणी असलेला हा खांब मोठ्या कौशल्याने काळजीपूर्वक हटविण्यात आला. खांब हटविण्याच्या या कामामुळे कांही काळ वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. तसेच जेसीबीच्या सहाय्याने संबंधित उंच मोठा इलेक्ट्रिकचा खांब कशा पद्धतीने हटविला जातो हे पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी झाली होती.

या संदर्भात बेळगाव लाईव्हशी बोलताना महामंडळाचे जनसंपर्कप्रमुख विकास कलघटगी म्हणाले की, श्री गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीच्या बैठकीत बेळगाव शहराचे प्रवेशद्वार असलेल्या धर्मवीर संभाजी महाराज चौकातील रहदारीस अडथळा ठरणाऱ्या या जुन्या धोकादायक इलेक्ट्रिक खांबबद्दल आम्ही हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांना कल्पना दिली होती. तसेच श्री विसर्जन मिरवणुकच नव्हे तर श्री शिवजयंती मिरवणूक तसेच अन्य मिरवणुका याच मार्गाने जात असल्यामुळे तो खांब हटवावा अशी विनंती केली होती. आमच्या विनंतीला मान देत आज सोमवारी धर्मवीर संभाजी चौक केळकर बाग रोड कॉर्नर वरील खांबासह किर्लोस्कर रोडवरील रहदारीस अडथळा ठरणारे आणखी दोन असे एकूण तीन इलेक्ट्रिकचे खांब हटविण्यात येत आहेत.

श्री गणेशोत्सवाला प्रारंभ होण्यापूर्वीपासून शहरातील सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळांना भेडसावणाऱ्या समस्या व अडचणी दूर करण्यासाठी गणेश महामंडळ सतत कार्यरत आहे. यंदा हेस्कॉम, पोलीस, महापालिका वगैरे सर्व सरकारी खात्यांचे गणेश महामंडळ व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना उत्तम सहकार्य लाभले आहे. समन्वय राखून समस्या व अडथळे दूर करण्याद्वारे श्री गणेशोत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी हेस्कॉमसह सर्व सरकारी खाती प्रशंसेस पात्र आहेत असे सांगून आपल्या माध्यमातून श्री गणेशोत्सव महामंडळाचे कार्य त्वरेने जनतेपर्यंत आणि गणेशोत्सव काळातील अडचणी व समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवल्याबद्दल विकास कलघटगी यांनी बेळगाव लाईव्हचे जाहीर आभार मानले.यावेळी मध्यवर्ती गणेश महामंडळाचे अध्यक्ष रमाकांत कोंडूस्कर, कार्याध्यक्ष रणजित चव्हाण पाटील आणि लोकमान्य महा मंडळाचे विजय जाधव आणि हेस्काँमचे वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते.Hescom

दरम्यान धर्मवीर संभाजी चौक परिसरात हेस्कॉम च्यावतीने सदर धोकादायक खांब काढतेवेळी या परिसरातील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता आणि काही काळ ट्रॅफिक देखील जाम झाला होता.

श्री गणेशोत्सव सुरळीत पार पडावा यासाठी रस्ते सुस्थितीत करावेत, रस्त्यावर अडथळा ठरणारे जुने इलेक्ट्रिक खांब हटवावेत, रस्त्यावर खाली लोंबकळणाऱ्या विजेच्या तारा वर ओढाव्यात, श्री मिरवणूक मार्गात अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या हटवाव्यात अशी मागणी बेळगाव लाईव्हच्या माध्यमातून लावून धरण्यात आली होती.

त्याची दखल घेत यापूर्वी शहरातील अन्य ठिकाणी रहदारीस अडथळा ठरणारे इलेक्ट्रिक खांब आणि आज धर्मवीर संभाजी महाराज चौक किर्लोस्कर रोडवरील खांब हटविण्यात आल्याबद्दल गणेश मंडळ व वाहनचालकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. सुरळीत शांत व विधायक असा श्री गणेशोत्सव व्हावा अशी समस्त शहरवासीयांची इच्छा आहे. त्यासाठी सुदृढ समाज माध्यम म्हणून सामाजिक बांधिलकी जपत बेळगाव लाईव्ह सातत्याने प्रयत्नशील राहात असते.

बेळगाव live सदर खांब काढावी अशी मागणी केलेली बातमी -चौकातील ‘हा’ जुना खांब हटवण्याची मागणी

चौकातील ‘हा’ जुना खांब हटवण्याची मागणी

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.