बेळगाव लाईव्ह :टिळकवाडी येथील सुभाष चंद्र बोस मैदान अर्थात लेले मैदानावरील कांही इलेक्ट्रिक खांबांच्या बॉक्समधील विजेच्या जिवंत तारा उघड्यावर पडल्या असून त्या तात्काळ बॉक्समध्ये सुरक्षित बंद कराव्यात, अशी मागणी जागरूक नागरिकांकडून केली जात आहे.
टिळकवाडीतील लेले मैदानावरील कांही इलेक्ट्रिक खांबांच्या बॉक्समधील विजेच्या जिवंत तारा उघड्यावर पडल्या आहेत. या मैदानावर खेळण्यासाठी दररोज सकाळ व संध्याकाळ मुलांची गर्दी होत असते. त्याचप्रमाणे बरेच जण मैदानावर फिरण्याचा व्यायाम करण्यासाठी येत असतात. मैदानावर खेळायला येणाऱ्या मुलांपैकी कांही तरुण मुले, कॉलेज विद्यार्थी मैदानावरील इलेक्ट्रिक खांबांचे दिवे चालू व बंद करत असतात.
या परिस्थितीत कांही खांबांच्या तळाशी असलेल्या बॉक्समधील विजेच्या जिवंत तारा उघड्यावर पडल्या आहेत. सध्या रिमझिम पाऊस पडत असून जमिनीवर ओलावा आहे. त्यामुळे थोडा जरी निष्काळजीपणा दाखवला तर या ठिकाणी एखाद्याला विजेचा धक्का बसू शकतो. बऱ्याचदा या मैदानावर मुलांची व फिरायला येणाऱ्यांची तुरळक गर्दी असते. अशावेळी जर विजेचा धक्का बसल्यास एखाद्याच्या जीवावर बेतू शकते.
मैदानावर असलेल्या इलेक्ट्रिक खांबांच्या बॉक्सला पूर्वी झाकणं होती. मात्र कालांतराने कोणी अज्ञाताने ती लंपास केली आहेत. त्यामुळे सध्या बॉक्स मधील जिवंत विजेच्या तारा बाहेर पडून धोका निर्माण झाला आहे.
तरी महापालिका आणि हेस्कॉनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन दुर्घटना घडण्याची वाट न पाहता संबंधित खांबांच्या उघड्यावर पडलेल्या विजेच्या तारा तात्काळ पूर्ववत सुरक्षित बॉक्समध्ये घालून त्या बॉक्सला नवी झाकणं बसवावीत, अशी मागणी जागरूक नागरिकांकडून केली जात आहे.