बेळगाव लाईव्ह: बेळगावातील चव्हाट गल्लीतील व्यंकटेश मंदिरात पारंपारिक पद्धतीने 94 वर्षांपासून सुरू असलेली गोकुळाष्टमी गुरुवारी पारंपरिक पद्धतीने उत्साह आणि जल्लोषात साजरी करण्यात आली.
गोकुळाष्टमी हा कृष्णभक्तांचा खास सण. अनेक ठिकठिकाणी तो आपापल्या परंपरेनुसार वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो, त्याचप्रमाणे गुरुवारी बेळगाव शहरात चव्हाट गल्ली आणि ढोर गल्ली येथे पारंपारिक पद्धतीने गोकुळाष्टमी उत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी कापडी पट्टीने डोळे झाकून दहीहंडी फोडण्याची स्पर्धा घेण्यात आली. त्यात गोपाळांनी जल्लोषात भाग घेतला.व्यंकटेश मंदिरचे अध्यक्ष अरुण धमुने यांनी याबाबत बेळगाव लाईव्ह शी बोलताना सांगितले की, गोकुळाष्टमी हा आमचा एक विशेष सण आहे. आमच्या व्यंकटेश मंदिरात गेली 94 वर्षांपासून अव्याहतपणे गोकुळाष्टमी साजरी करत आहोत.
आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पुजारी डोळे कापडाने बांधून दहीहंडी फोडतात.हे परंपरेने चालत आले आहे. आतापर्यंत येथे कोणताही गोंधळ झालेला नाही. सर्वजण एकत्र येऊन एकोप्याने उत्सव साजरा करतात.आम्ही सकाळपासून विशेष प्रार्थना केली आहे.
एकंदर, बेळगावचे एक वैशिष्ट्य असलेल्या चव्हाट गल्ली व्यंकटेश मंदिरात आज बालगोपालांनी गोकुळाष्टमीचा भरभरून आनंद घेतल्याचे दिसून आले.