बेळगाव लाईव्ह :आजकाल प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांची बरोबरी करू लागल्या आहेत. तेंव्हा पुरुषांनीही मागे न राहता महिलांच्या कामांमध्ये प्राबल्य मिळवले पाहिजे या उद्देशाने जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव (मेन)तर्फे आयोजित शालेय मुलांना भाकरी बनवण्याचे प्रशिक्षण देण्याचा आगळा उपक्रम आज शनिवारी सकाळी उत्साहात पार पडला.
जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनच्या कार्यालयाच्या ठिकाणी आयोजित या प्रशिक्षण उपक्रमासाठी खास मोठा तवा असलेल्या गॅसच्या शेगड्यांची व्यवस्था करण्यात आली होती. उपक्रमात सहभागी शालेय विद्यार्थ्यांना प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पीठ मिळवून, थापटवून, तव्यावर भाजून परतवून भाकरी बनवण्याचे धडे देण्यात आले. याप्रसंगी जायंट्सचे पदाधिकारी, सदस्य, शिक्षक आणि पालकवर्ग उपस्थित होता.
जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. घरामध्ये कायम आईसोबत असल्यामुळे मुली भाकऱ्या करायला शिकतात. त्यामुळे जायंट्स ग्रुपने मुलांसाठी भाकरी बनविण्याचा हा उपक्रम राबविला आहे.
मुले देखील अत्यंत उत्साहाने या उपक्रमात सहभागी होऊन भाकरी बनवण्यास शिकत आहेत . आत्मसात केलेली कोणतीही कला वाया जात नाही, त्यामुळे भाकरी बनवण्याची ही कला मुलांना त्यांच्या भविष्यात कामधंद्यानिमित्त जेंव्हा एकटे राहावे लागेल त्यावेळी निश्चितपणे उपयोगी पडणार आहे.
सदर उपक्रमाबद्दल मी जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनचे आभार मानते. तसेच यापुढेही शालेय मुलांच्या हितासाठी त्यांनी या पद्धतीचे आदर्शवत उपक्रम राबवावेत, असे एका शिक्षिकेने बेळगाव लाईव्हशी बोलताना सांगितले.