अनंत चतुर्दशी म्हणजे श्री गणेश विसर्जन मिरवणुकी दिवशीची आपली ईद सणाची मिरवणूक पुढे ढकलून ती येत्या 1 ऑक्टोबर रोजी आयोजित केल्याबद्दल मध्यवर्तीय सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळातर्फे कार्याध्यक्ष रणजीत चव्हाण -पाटील यांनी मुस्लिम नेत्यांसह शहरातील समस्त मुस्लिम बांधवांचे जाहीर आभार मानले आहेत.
मध्यवर्तीय सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाच्यावतीने बेळगाव लाईव्हशी बोलताना माजी नगरसेवक रणजीत चव्हाण -पाटील म्हणाले की, यंदा अनंत चतुर्दशीची श्री विसर्जन मिरवणूक आणि ईदची मिरवणूक एकाच दिवशी येत असल्याचा मुद्दा उपस्थित झाला होता.
ईद मिरवणूक दुपारी तीन वाजेपर्यंत समाप्त होईल अशी आमची समजूत होती. मात्र मुस्लिम बांधवांनी दोन दिवसापूर्वी स्तुत्य निर्णय घेतला. मुस्लिम समाजाच्या पुढार्यांनी म्हणजे आमदार असिफ सेठ, नगरसेवक मुज्जमिल डोणी आदींच्या नेतृत्वाखाली मुस्लिम समाज बांधवांनी एक बैठक घेतली.
या बैठकीत श्री गणेश विसर्जन मिरवणूक आणि ईद मिरवणूक अशा दोन्ही मिरवणुकी एकाच दिवशी झाल्यास घाईगडबड, गोंधळ होऊ नये यासाठी ईदची मिरवणूक 1 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.
यासाठी मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळ, शहर देवस्थान कमिटी आणि शहरातील समस्त हिंदू बांधवांतर्फे मी त्यांचे अभिनंदन करतो आणि सदर स्तुत्य निर्णय घेतल्याबद्दल मुस्लिम समाजाचे जाहीर आभार मानतो, असे चव्हाण -पाटील यांनी सांगितले.
https://x.com/belgaumlive/status/1702669878031970668?s=20