बेळगाव लाईव्ह :येत्या श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज मंगळवारी सकाळी जिल्हा प्रशासन, पोलीस आयुक्तालय, महापालिका हेस्कॉम वनखाते आधी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी विसर्जन तलावांसह श्री गणेश विसर्जन मार्गाचा संयुक्त पाहणी दौरा केला.
श्री गणेशोत्सव जवळ येत चालला असून तो दरवर्षीप्रमाणे उत्साहाने शांततेत पार पडावा यासाठी महापालिकेत जिल्हा पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ठरल्यानुसार जिल्हा प्रशासन, पोलीस व महापालिका प्रशासनाने पूर्वतयारी सुरु केली आहे. यंदाचा गणेशोत्सव येत्या 19 ते 28 सप्टेंबर या कालावधीत 10 दिवस साजरा केला जाणार आहे. त्या अनुषंगाने वरिष्ठ प्रशासकीय आणि पोलीस अधिकारी आज मंगळवारी सकाळी शहरातील रस्त्यावर उतरले होते. शहरातील हुतात्मा चौक येथून अधिकाऱ्यांच्या पाहणी दौऱ्याला प्रारंभ झाला. यावेळी श्री विसर्जन मिरवणूक मार्ग असलेल्या अरुंद रामदेव गल्ली येथील ठिकठिकाणी खुल्या असलेल्या गटारींचा मुद्दा गणेशोत्सव महामंडळाचे जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी यांनी उपस्थित केला. या ठिकाणच्या गटारी कांही ठिकाणी खुल्या आहेत त्यामुळे मिरवणुकी सोबत जाणारे कार्यकर्ते किंवा रस्त्याशेजारी थांबलेल्या गणेश भक्तांच्या बाबतीत दुर्घटना घडू शकते. तेंव्हा सदर गटारींवर अच्छादन अर्थात फरशा घालाव्यात. मागील शिवजयंती मिरवणुकीप्रसंगी केलेली ही मागणी यावेळी तरी पूर्ण करावी. त्याचप्रमाणे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या श्रीमूर्ती 12 फुटापेक्षा उंच म्हणजे जवळपास 16 ते 18 फूट उंचीच्या असतात. त्यामुळे रस्त्यावर खाली लोंबकळणाऱ्या धोकादायक विजेच्या तारा आणि रस्त्या शेजारील झाडांच्या फांद्या यांचा अडथळा दूर करावा अशी विनंती कलघटगी यांनी केली त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तशा सूचना केल्या. त्यानंतर श्री गणेश विसर्जन मिरवणुकीचा मुख्य केंद्रबिंदू असलेल्या धर्मवीर संभाजी चौकाची अधिकाऱ्यांनी पाहणी केली. यावेळी विकास कलघटगी यांच्यासह महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे गणेश भक्तांच्या विशेष करून महिलावर्ग व लहान मुलांच्या सोयीसाठी वनिता विद्यालयाच्या बाजूला प्रशस्त प्रेक्षक गॅलरी उभारण्याची विनंती केली.
श्री विसर्जन दिवशीच असलेल्या ईद-ए-मिलाद मिरवणुकीचा मुद्दा याप्रसंगी उपस्थित झाला. तेंव्हा महामंडळाचे विकास कलघटगी यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी मुस्लिम बांधवांची मिरवणूक फोर्ट रोड येथून निघून चन्नम्मा सर्कल मार्गे दुतर्फा कॉलेज रोडवरील धर्मवीर संभाजी चौकातील गणेशोत्सवासाठी असलेल्या प्रेक्षक गॅलरीच्या विरुद्ध बाजूला असलेल्या मार्गाने कॅम्प येथील आसद खान दर्गाकडे जाते. त्यामुळे सकाळी सुरू होऊन दुपारी समाप्त होणाऱ्या त्या मिरवणुकीला प्रेक्षक गॅलरीचा कोणताच अडथळा होणार नसल्याचे स्पष्ट केले. हे स्पष्टीकरण पटल्याने
जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना श्री विसर्जन मिरवणुकीसाठी धर्मवीर संभाजी चौकात प्रशस्त गॅलरी उभारण्याची सूचना केली.
धर्मवीर संभाजी चौकातून जिल्हाधिकाऱ्यांसह सर्व अधिकारी रामलिंग खिंड गल्ली मार्गे पायी चालत कपिलेश्वर तलावाकडे निघाले. त्यावेळी शनी मंदिर येथील कोपऱ्यावर असलेल्या विसर्जन मिरवणुकीस अडथळा ठरणाऱ्या भिंतीची समस्या महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. संबंधित जागेच्या मालकांची भिंत पाडवण्यास संमती असताना देखील ती भिंत हटविण्यास चालढकल केली जात असल्याचे सांगण्यात येताच जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित मालकाला बोलावून भिंतीची समस्या निकालात काढण्याची सूचना मनपा अधिकाऱ्यांना केली. त्यानंतर सर्वधिकार्यांसमवेत त्यांनी श्री कपिलेश्वर मंदिर येथील दोन्ही विसर्जन तलावांना भेट देऊन पाहणी केली.
यावेळी नव्या कपिलतीर्थ तलावाच्या भिंतीला डाव्या बाजूने भोके पाडण्यात आली आहेत. त्या ठिकाणी दरवाजाही करण्यात आला आहे. शिवाय तेथील कांही रहिवाशांनी तलावाच्या भिंतीत कबूतर खाना बनविला आहे. या बाबी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देताच त्यांनी नापसंती नाराजी व्यक्त केली. तसेच सदर तलाव ही महापालिकेची सार्वजनिक मालमत्ता आहे. याचा या पद्धतीने दुरुपयोग होता कामा नये असे सांगून कबूतर खाना तात्काळ हटविण्याचा आदेश दिला. त्याचप्रमाणे तलावाच्या ठिकाणी निर्माण केलेला दरवाजा बंद करून आवश्यक दुरुस्ती करण्याची सूचना केली.
श्री कपिलेश्वर तलावानजीक एसपीएम रोडवरील रेणुका हॉटेल सर्कल म्हणजे शहापूरसह अन्य भागातून विसर्जनासाठी येणाऱ्या श्री गणेश मूर्तींचे जंक्शन असल्याचे ध्यानात घेऊन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी विसर्जना दिवशी या ठिकाणी कशा पद्धतीने मिरवणुकीने येणाऱ्या श्री गणेश मूर्तींच्या रहदारीचे नियंत्रण केले जाते याची माहिती घेतली. एसीपी एन. व्ही. बरमनी यांच्यासह महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना ती माहिती दिली. जिल्हाधिकाऱ्यांसह अन्य अधिकाऱ्यांच्या या आजच्या संयुक्त पाहणी दौऱ्याचे ड्रोनद्वारे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले हे विशेष होय. पाहणी दौऱ्या प्रसंगी बोलताना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी बेळगावच्या श्री सार्वजनिक गणेशोत्सवाला 119 वर्षाची फार जुनी परंपरा आहे. खुद्द स्वातंत्र्य सेनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी 1905 साली झेंडा चौक येथे बेळगावात सर्वप्रथम सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. बेळगावचा गणेशोत्सव हा फक्त कर्नाटकातच नाही तर देश विदेशात सुप्रसिद्ध आहे. बेळगाव सारखा गणेशोत्सव कर्नाटकात कोठेच साजरा केला जात नाही असे स्पष्ट करण्याबरोबरच या गणेशोत्सवाचा आनंद लुटण्यासाठी स्थानिक गणेश भक्तांसह महाराष्ट्र आणि गोव्यातील लाखो गणेश भक्त बेळगावला भेट देत असतात. त्यामुळे या भक्तांची गैरसोय टाळण्यासाठी श्री गणेश विसर्जन मिरवणूक सलगपणे पार पडावी आणि याची दक्षता शहरातील सर्व सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळांनी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी केले. तसेच श्री गणेशोत्सव महामंडळाच्या प्रत्येक सूचना आणि मागणीची दखल घेऊन त्याची पूर्तता केली जाईल असेही त्यांनी सांगितले.
याप्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांसमवेत महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी, शहर पोलीस आयुक्त एस. एन. सिद्धारामप्पा, कायदा व सुव्यवस्था पोलीस उपायुक्त एस. टी. शेखर, गुन्हा व वाहतूक पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा महापालिकेच्या वरिष्ठ अधिकारी लक्ष्मी निप्पाणीकर, मार्केट उपविभागाचे एसीपी एन. व्ही. बरमनी, खडेबाजार उपविभागाचे एसीपी अरुणकुमार कोळ्ळूर, हेस्कॉम शहर उपविभागाचे कार्यकारी अभियंता अश्विन शिंदे संजीव हणमन्नावर, महापालिकेच्या अधीक्षक अभियंता लक्ष्मी निप्पाणीकर तसेच अन्य अधिकाऱ्यांसह मध्यवर्ती श्री सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, कार्याध्यक्ष रणजीत चव्हाण -पाटील, कार्यकारी सचिव आनंद आपटेकर, जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी, लोकमान्य टिळक सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष विजय जाधव कार्याध्यक्ष सुनील जाधव आदीसह स्थानिक नगरसेवक उपस्थित होते.