बेळगाव लाईव्ह :श्री गणेश विसर्जना दिवशी शहर आणि उपनगरातील सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ आणि आपला लिलावाचा कार्यक्रम सकाळच्या सत्रात उरकून विसर्जनासाठी आपापल्या मूर्ती मंडपातून लवकर बाहेर काढाव्यात. त्याचप्रमाणे मिरवणूक काळात रात्री 10 वाजेपर्यंतच ध्वनीयंत्रणा लावावी, अशी सूचना पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांनी केली आहे.
मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाचे पदाधिकारी आणि पोलिस अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक काल रविवारी एपीएमसी कार्यालयात पार पडली. याप्रसंगी बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून पोलीस उपायुक्त जगदीश बोलत होते. विसर्जन मिरवणूक वेळेत पार पडावी यासाठी सर्व मंडळांनी सहकार्य करावे. तसेच मिरवणुकी वेळी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मोठ्या आवाजाच्या ध्वनियंत्रणा लावण्यास बंदी कायम असणारा असून एक बेस व एक टॉप लावण्याची मुभा असणार आहे. मात्र रात्री 10 नंतर नियमाप्रमाणे मंडळांनी ध्वनी यंत्रणा बंद करावी. याशिवाय सर्व गणेश मंडळांनी श्रीमूर्ती मंडपातून लवकर बाहेर काढण्यासाठी आपले लिलाव सकाळच्या सत्रात सुरू करावेत, असे पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांनी स्पष्ट केले.
श्री विसर्जन मिरवणुकी संदर्भात चव्हाट गल्ली आणि खडक गल्ली येथील सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी व नागरिकांची विशेष संवाद साधला जाणार असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी यावेळी दिली. विसर्जन मिरवणुकीला का विलंब होत आहे? तसेच कोणत्या अडचणी येत आहेत? यासाठी वेगवेगळ्या भागातील मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना घेऊन पाहणी करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.