बेळगाव लाईव्ह :गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात आज मंगळवारी श्री गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर सार्वजनिक मंडळांसह बेळगाव शहर आणि तालुक्यामध्ये घरोघरी श्री गणेशाचे जल्लोषी स्वागत करून अत्यंत भक्तीभावाने प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.
गेल्या पंधरा दिवसापासून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी तसेच घरोघरी तरुणाईने बाप्पाच्या आगमनाची पुर्वतयारी सुरू केली होती. त्यांच्या सजावटीच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी बाजारपेठही सजावटीच्या साहित्याने सजली होती. विविध प्रकारच्या सजावटीच्या साहित्यांसह बाप्पाच् बाप्पांची प्रतिष्ठापना करण्याच्या ठिकाणी मंडळामध्ये आणि घरातही रात्रीपर्यंत आरास करण्याचे काम सुरू होते.
मंगळवारी सकाळपासून संध्याकाळपर्यंत वाजत गाजत श्रीमूर्ती आणून त्यांची प्रतिष्ठापना करण्यात आली. कांही हौशी मंडळींनी श्रीमूर्ती आणताना वाजंत्री ठेवले होते. मूर्तिकार आणि मूर्ती ठेवलेल्या ठिकाणच्या रस्त्यावर आज दिवसभर विशेष करून सकाळी श्रीमूर्ती घेऊन जाण्यासाठी येणाऱ्या गणेश भक्तांची गर्दी पहावयास मिळत होती.
गेल्या कांही दिवसांपासून आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची प्रतीक्षा संपलेल्या शहर आणि तालुकावासियांनी आज श्री गणेश चतुर्थी दिवशी त्याचे उत्स्फूर्त जल्लोषी स्वागत करून विधिवत प्रतिष्ठापना केली.
घराघरात आणि गल्लोगल्लीमध्ये आज पहाटेपासून श्री गणरायाच्या स्वागताची तयारी सुरू झाली होती. त्याचप्रमाणे दिल्यानंतर मूर्ती प्रतिष्ठापना केल्यानंतर तिची विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर आरती होऊन मोदक किंवा पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात आला. घरातील श्रीमूर्तीची पूजा पूर्ण करून तरुणाई व बालचमू सार्वजनिक मंडळाचा गणपती आणण्यासाठी घराबाहेर पडत होते.
ढोल ताशांचा गजरासह फटाक्यांच्या आतषबाजीत सार्वजनिक श्रीमूर्ती आणून मंडपात स्थापन करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत विविध ठिकाणी श्री मूर्तींची प्रतिष्ठापना सुरू होती श्री मूर्ती आणताना कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. त्याचप्रमाणे पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता.