बेळगाव लाईव्ह :शहर परिसरात कोल्ह्यांचा वावर सुरू झाल्यामुळे वनखात्याची डोकेदुखी वाढलेली असतानाच आता आज बुधवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास बेनकनहळ्ळी -सावगाव रस्त्या शेजारील शिवारामध्ये आणखी एका कोल्ह्याचे दर्शन घडले आहे.
बेनकनहळ्ळी -सावगाव रस्त्यावर आज सकाळी नेहमीप्रमाणे ये -जा करणाऱ्या वाहन चालकांना 10 वाजण्याच्या सुमारास रस्त्याशेजारील शेतवाडीत कोल्हा फिरत असल्याचे निदर्शनास आले. तेंव्हा काहींनी त्याचे छायाचित्र टिपण्याबरोबरच व्हिडिओ चित्रीकरण देखील केले. कोल्ह्याचा हा वावर सध्या चर्चेचा विषय झाला आहे. त्याचप्रमाणे सदर परिसरात असलेल्या नागरी वसाहतीमध्ये भीती व्यक्त होत आहे.
दरम्यान मानवी वसाहतीत कोल्ह्यांचा वावर वाढल्याने वनखात्याची डोकेदुखी वाढली असली तरी पशुप्रेमींमध्ये वन्य प्राण्यांविषयी चिंता व्यक्त होऊ लागली आहे. गतवर्षी बेळगावच्या रेसकोर्स मैदान परिसरात बिबट्याने तब्बल महिनाभर तळ ठोकला होता त्यामुळे शहरवासीयांची झोप उडाली होती. तो बिबट्या अखेर सहीसलामत पुन्हा नैसर्गिक अधिवासात निघून गेला. त्यानंतर आता शहरात कोल्ह्याची दहशत वाढली आहे.
शास्त्रीनगर व शिवाजीनगर येथे अलीकडेच सापडलेल्या कोल्ह्याची रवानगी भूतरामहट्टी येथील प्राणी संग्रहालयात करण्यात आली आहे. आता नव्याने शहरानजीक बेनकनहळ्ळी -सावगाव रस्त्याशेजारी शेतामध्ये कोल्ह्याचे दर्शन घडले आहे. शहर परिसरातील कोल्ह्याच्या वाढत्या वावराबद्दल बोलताना वन खात्याचे एसीएफ शिवरुद्रप्पा कबाडगी यांनी अलीकडे बेळगाव परिसरात वनक्षेत्रात वाढ झाली आहे.
दरवर्षी हजारोंच्या संख्येने वृक्ष लागवड होऊ लागले आहे. त्यामुळे वनक्षेत्रात भर पडली असून वन्य प्राण्यांचे संवर्धन होत आहे, शिवाय वन्य प्राण्यांची संख्याही वाढू लागली आहे. त्यामुळेच सैरभैरहून वन्यप्राणी शहरात येऊ शकतात, असे मत व्यक्त केले आहे.