बेळगाव लाईव्ह :हालगा गावानजीक सुवर्ण विधानसौधच्या पुढे पुणे -बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर मालवाहू ट्रकमध्ये भरलेल्या प्लायवूडच्या फळ्यांमध्ये दडवून गोव्याहून अन्यत्र नेण्यात येणारा महागड्या उंची दारूचा लाखो रुपयांचा अवैधसाठा अबकारी खात्याने जप्त केल्याची घटना काल रात्री 3:30 च्या सुमारास घडली.याप्रकरणी ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आले असून अबकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बेळगाव सापडलेला आत्तापर्यंतचा हा सर्वात मोठा अवैध दारूचा साठा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोव्याहून एका मालवाहू ट्रकमधून मोठ्या प्रमाणात दारूच्या साठ्याची बेकायदा वाहतूक करण्यात येत असल्याची टीप खबऱ्याकडून मिळताच बेळगाव अबकारी खात्याचे अधीक्षक विजयकुमार आणि उपाधीक्षक मुरगोड यांच्या मार्गदर्शनाखाली अबकारी खात्याच्या पथकाने सापळा रचला. त्यानुसार गोव्याहून निघालेल्या संबंधित ट्रकचा पाठलाग करण्यात आला आणि काल रात्री 3:30 वाजण्याच्या सुमारास शहरा बाहेरील राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 वर बेळगाव सुवर्ण विधानसौधच्या थोडे पुढे अबकारी पथकाने सदर ट्रक (क्र. केए 25 एए 6461) अडविला.
त्यानंतर अबकारी अधिकाऱ्यांनी ट्रक चालकाची चौकशी केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. तेंव्हा संशयावरून सदर ट्रक बेळगाव अबकारी भवन आवारात आणण्यात आला. त्यानंतर आज शनिवारी सकाळी प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींसमक्ष ट्रकची तपासणी करण्यात आली. त्यावेळी ट्रकमध्ये भरलेल्या प्लायवूडच्या मोठ्या फळ्यांच्या साठ्यामध्ये आतल्या बाजूला प्लायवूड कापून निर्माण केलेल्या दोन मोठ्या कप्प्यांमध्ये महागड्या उंची दारूच्या बाटल्यांचा साठा आढळून आला. बाहेरून कोणालाही कल्पना येणार नाही अशा पद्धतीने दारूच्या बाटल्यांचे बॉक्स प्लायवूडच्या फळ्यांमध्ये दडविण्यात आले होते.
जप्त करण्यात आलेल्या या लाखो रुपयांच्या दारूच्या साठ्यामध्ये ब्लेंडर स्प्राईड, सिग्नेचर वगैरे विविध प्रकारच्या महागड्या उंची दारूच्या बाटल्यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे बियरच्या बाटल्या देखील सापडल्या आहेत.
अबकारी खात्याचे संयुक्त आयुक्त फिरोज खान किल्लेदार यांनी अबकारी भवन आवारात आज सकाळी प्रसिद्धी माध्यमांना उपरोक्त कारवाईची माहिती दिली. त्याचप्रमाणे जप्त करण्यात आलेल्या दारूच्या साठ्याची अद्याप संपूर्ण तपासणी आणि मोजदाद करावयाची आहे. त्यामुळे त्यानंतरच जप्त केलेल्या दारूची निश्चित किंमत समजणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच बेळगावात अबकारी खात्याने आजवर जप्त केलेल्या अवैध दारू साठ्यांपैकी हा साठा सर्वात मोठा आहे.
सदर दारू गोव्याहून कोठे नेण्यात येत होती? यामागचा मुख्य सूत्रधार कोण? आदी संदर्भात सखोल चौकशी व तपास कार्य हाती घेतले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
एखाद्या चित्रपटाला साजेल या पद्धतीने ट्रक मध्ये दारू साठा लपवून ठेवला होता अलीकडेच रिलीज झालेल्या पुष्पा या चित्रपटाची हे पाहून आठवण झाली असेही एका अधिकाऱ्यांना यावेळी अनौपचारिक रित्या बोलताना सांगितले.