बेळगाव लाईव्ह :बेळगाव जिल्ह्यात विजेचा धक्का लागून मृत्यू होण्याचे प्रमाण अलीकडे वाढले असून गेल्या 5 महिन्यात जिल्ह्यात विजेच्या धक्क्याने तब्बल 27 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. यापैकी बहुतांश म्हणजे 24 जण शेतकरी असून जे शेतात विजेच्या शॉक लागून मृत्युमुखी पडले आहेत.
घरासमोर खांबावरील वीज वाहिनी तुटून पडल्याने उडकेरी (ता. बैलहोंगल) येथे बाप -लेकाचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच तीन दिवसांपूर्वी घडली. तत्पूर्वी गेल्या महिन्यात बिजगर्णी येथे शेतकरी पती-पत्नी तर अथणी तालुक्यात दोन शेतकऱ्यांना विजेच्या धक्क्याने आपला जीव गमवावा लागला होता.
कांही दिवसांपूर्वी बेळगाव शहरातील शाहूनगर येथे अपार्टमेंट बांधकामाच्या ठिकाणी विजेचा धक्का लागून आजोबा, आजी व नातीचा मृत्यू झाला. हारूरी (ता खानापूर) येथे पिकांना पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचाही विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला.
विजेच्या धक्क्याने मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये जनावरांची संख्याही अधिक आहे. त्यामुळे धोकादायक खांब व वीज वाहिन्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
गेल्या एप्रिल ते ऑगस्ट या 5 महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात विजेच्या धक्क्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या 27 जणांमध्ये बेळगाव शहरातील 4 जणांसह बेळगाव ग्रामीण 3, बैलहोंगल 3, रामदुर्ग 1, घटप्रभा 1, चिक्कोडी 5, अथणी 5 आणि रायबाग येथील 2 जणांचा समावेश आहे.