बेळगाव लाईव्ह :गोव्याहून दिल्लीला जाणाऱ्या वास्को-निजामुद्दीन ट्रेनमध्ये प्रवास करणारे मध्य प्रदेशातील आठ प्रवासी बेशुद्धावस्थेत आढळून आले. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आठपैकी सात जणांना शुद्ध आली असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे.
त्यांना चॉकलेटमधून विषबाधा किंवा गांजामुळे प्रकृती खराब झाल्याचाही अंदाज व्यक्त होत आहे.
लोंढा स्थानक सोडल्यानंतर एकाच डब्यातून प्रवास करणाऱ्या आठ प्रवाशांना दोन वेळा उलट्या झाल्या. मग जे झोपले ते उठलेच नाहीत. पण सहप्रवासी त्यांना संशय आल्याने आठही जणांना उठवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे प्रवाशांनी बेळगाव स्थानक येताच रेल्वे पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तपासणी केली असता सर्वजण बेशुद्धावस्थेत होते.
त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात आणि नंतर खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आठ प्रवाशांनी दिल्लीजवळील मध्य प्रदेशातील खांडवा शहरात जाण्यासाठी तिकीट काढले होते.
दूषित अन्न खाल्ल्याने किंवा विषबाधेमुळे ही घटना घडली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. आजारीपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. हे सर्वजण गोव्यात कार्यरत असल्याची माहिती आहे.