Monday, November 18, 2024

/

शाडूच्या मातीच्या गणेश मूर्तींची वाढती मागणी

 belgaum

बेळगाव लाईव्ह : फोटोतील भव्यदिव्य मूर्तीसारख्या हुबेहूब घरगुती गणेशमूर्ती कमी उंचीत साकारण्याचा गणेशभक्तांचा हट्ट असतो. हौसेला मोल नसते, हे खरे असले, तरी गणेशाचे पावित्र्य जपून कलात्मक मूर्ती साकारणे हेच मूर्तिकारांचे आद्य कर्तव्य असते,’ असे सांगून भडकल गल्लीतील मूर्तिकार परशराम पालकर यांनी त्यांच्या मूर्तिकलेचा प्रवास मांडला.

गुढी पाडव्यानंतर मूर्तींचे काम सुरू करून दर वर्षी 150 घरगुती, तसेच तीन सार्वजनिक मूर्ती पालकरांच्या हातून घडतात. ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या दिवसाला शेकडो मूर्ती तयार होतात. याउलट शाडू मातीच्या मूर्ती बनवताना मातीशी ‘एकरूप’ होता येते. शाडू मातीशी खेळत मूर्ती तयार करण्यातच मूर्तिकाराचे खरे कसब असते,’ मूर्तिकलेत कोणतेही काम लहान-मोठे नसते, तरीही गणरायाचे डोळे रेखाटताना मूर्तिकारांना विशेष मेहनत घ्यावी लागते.

पर्यावरणपूरक मूर्तींची संख्या वर्षागणिक वाढत असताना शाडू मातीच्या मूर्तींची मागणी वाढली आहे; मात्र अनेक मूर्तिकार ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्ती घडवण्यास प्राधान्य देताना दिसतात. तरुणांना विविध क्षेत्रांतील संधी खुणावत असताना मूर्तिकलेकडे करिअर म्हणून पाहणारे हाताच्या बोटावर मोजणारेच उरले आहेत. मूर्तींची किंमत वर्षाला सरासरी वीस टक्क्यांनी वाढते. त्यामुळे मूर्तिकला कदापि तोट्यात जाणारा व्यवसाय ठरत नाही.

परंपरागत राजेशाही बैठक, पद्मासन गणपती, लोडवाला बाप्पा, देवळातील गणपती इत्यादी गणेशाच्या पारंपरिक मूर्ती घेण्याकडे लोकांचा कल होता. तसेच तिरुपती, विठ्ठल, शिर्डीचे साईबाबा अशा देवांच्या प्रतिकृतीत मूर्ती बनवून मागणारे गणेशभक्त आहेत; मात्र सध्याच्या युगात ‘बाहुबली’ ते टीव्ही मालिकेतील ‘जय मल्हार’सारख्या हुबेहूब प्रतिकृती मागणारे गणेशभक्त वाढत आहेत. टीव्हीच्या प्रभावामुळे गणेशभक्त अशा मूर्तींकडे वळतात. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या भव्यदिव्य मूर्तींचे फोटो हातात घेऊन हुबेहूब तशीच मूर्ती कमी उंचीत घडवण्याचा हट्ट भक्तगण धरतात. तरीही मूर्तिकार या नात्याने घरगुती वातावरणाला साजेशी मूर्ती बनवण्याकडे मूर्तिकारांचा कल असतो.

Shadu murti
बेळगाव येथील मराठा लाईट इन्फंट्री चा शाडूचा पाच फुटी गणेश मूर्ती साकारताना मूर्तिकार परशराम पालकर

गणेशोत्सवाचे मांगल्य जपले जावे आणि पर्यावरणाचेही संवर्धन व्हावे यासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीऐवजी शाडू मातीच्या मूर्ती बसविण्यास गणेश भक्तांकडून यंदा प्राधान्य देण्यात आले. विशेषत: घरोघरी गणेशाची प्रतिष्ठापना करणार्‍या भक्तांकडून शाडू मातीच्याच मूर्तींचा आग्रह धरला जात असल्याचे पहावयास मिळत आहे. शाडू मातीच्या बहुतांश मूर्तींची विक्री झाल्याचा दावा विक्रेते तसेच पर्यावरण संवर्धनाची चळवळ चालविणार्‍यांकडून करण्यात आला.

बुध्दिची देवता विघ्नहर्त्या गणरायाचे सप्टेंबर महिन्यात 19 रोजी भक्तीमय वातावरणात आणि जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे. बाजारपेठेत प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचीच दुकाने यंदाही अधिक असली, तरी शाडू मातीच्या गणपती स्टॉल्सची संख्याही गतवर्षीपेक्षा वाढली आहे.
विशेष म्हणजे अनेक स्टॉल्सवर दरवर्षी शाडूच्या कमी आणि पीओपीच्या मूर्तीच अधिक असतात. मात्र यंदा अशा लायन्स क्लबने देखील पर्यावरण पुरक गणेशमूर्ती विक्री करण्यासाठी शहरात 40 हून अधिक ठिकाणी शाडूमातीच्या मूर्ती विक्रीसाठी ठेवल्या आहेत. खानापूर तालुका, गोकाक व पेनहून शाडूमातीच्या मूर्ती बाजारात उपलब्ध आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.