बेळगाव लाईव्ह :बेळगाव सुवर्ण विधानसौध परिसरातील शेतजमिनींसाठी असलेल्या सर्व्हिस रोडच्या ठिकाणी निर्माण केले जाणारे अडथळे त्वरित दूर करून तो शेतकऱ्यांसाठी सोयीचा करावा या मागणीसह बेळगाव तालुका देखील दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी मागणी बेळगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे केली आहे.
हलगा, बस्तवाड, कर्ले, किणये आदी भागातील शेतकऱ्यांनी ॲड. अण्णासाहेब घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीचे निवेदन मुख्यमंत्र्यांना धाडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. आपल्या मागणीसंदर्भात प्रसिद्धी माध्यमांना माहिती देताना ॲड. अण्णासाहेब घोरपडे म्हणाले की, आम्ही मुख्यमंत्र्यांना विनंती करत आहोत की हलगा, बस्तवाड, कर्ले, किणये आदी भागातील थोडक्यात बेळगाव तालुक्यातील शेतपिकं पावसाअभावी धोक्यात आली आहेत.
सरकारने बेळगाव जिल्ह्यातील इतर तालुके दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केले आहेत. तथापि बेळगाव तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आलेला नाही. वस्तुस्थिती लक्षात घेता पाऊस नसल्यामुळे सर्वाधिक फटका बेळगाव तालुक्याला बसला आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांची भात व अन्य पिकं धोक्यात आली असून ही पिके नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. याची गांभीर्याने दखल घेऊन बेळगाव तालुका देखील दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केला जावा. त्याचप्रमाणे येथील शेतकऱ्यांना प्रति एकर 50 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी आणि त्यांच्या कुटुंबीयांना रेशन उपलब्ध करून दिले जावे अशी मागणी आम्ही मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे केली आहे.
दुसरा मुद्दा म्हणजे बेळगाव सुवर्ण विधानसौध इमारत उभारण्यासाठी हलगा, बस्तवाड येथील शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिल्या आहेत. त्यावेळी तत्कालीन जिल्हाधिकारी एन. जयराम यांनी विधानसौध परिसरातील शेतजमिनींकडे जाण्यासाठी सर्व्हिस रस्त्याची सोय करून दिली होती. आपल्या शेतीच्या कामासाठी शेतकऱ्यांना हा रस्ता अत्यंत सोयीचा होत असताना आता सार्वजनिक बांधकाम खाते व संबंधित अन्य खात्याच्या अधिकाऱ्यांकडून या रस्त्याच्या वापरास आडकाठी आणली जात आहे.
या रस्त्याच्या ठिकाणी तारांचे कुंपण घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. सध्या गटारीच्या बांधकामासाठी खुदाई करून शेतकऱ्यांच्या ये-जा करण्याच्या मार्गावर अडथळा निर्माण करण्यात आला आहे. याकडे गांभीर्याने लक्ष देऊन सदर अडथळा दूर करावा.
तसेच सर्व्हिस रोडच्या ठिकाणी घालण्यात आलेले तारेचे कुंपण काढून टाकावे अशी मागणी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे, असे ॲड. अण्णासाहेब घोरपडे यांनी सांगितले.यावेळी वकील बेडका, गणपत मारीहालकर, सागर कामानाचे, नवनाथ खामकर आदी उपस्थित होते.