बेळगाव लाईव्ह: मंगळवारी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या जनता दर्शन कार्यक्रमात जनतेच्या समस्या जागेवरच तक्रारींचे निवारण करा अशा सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी केल्या आहेत.
जनतेच्या तक्रारी निवारण्यासाठी मंगळवारी (दि. 26) सकाळी 11 वाजता नेहरू नगर येथील केपीटीसीएल भवन येथे जिल्हास्तरीय जनता दर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या तक्रारींचे जागेवरच निवारण करण्यात यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी केल्या आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनात सोमवारी (दि. 25) जनता दर्शनच्या तयारीबाबत झालेल्या अधिकार्यांच्या बैठकीत ते अध्यक्षस्थानी होते.
जनता दर्शन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी राहणार असून जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
मिळणार जेवण भोजनाची सोय
जनता दर्शनमध्ये तक्रार देण्यासाठी येणार्या लोकांसाठी भोजनाचीही व्यवस्था करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले. यावेळी लोकांना सरकारच्या विविध योजनांची माहिती दर्शवणारे स्टॉलही उभारण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
जनतेकडून आलेल्या तक्रारी स्कॅन करून पब्लिक ग्रीव्हन्स रिड्रेसल सिस्टीम पोर्टलवर अपलोड केल्यानंतर संबंधित विभागाच्या अधिकार्यांनी ठराविक मुदतीत त्यांचा निपटारा करणे आवश्यक आहे. त्यामुळे अधिकार्यांनी जागेवरच जनतेच्या तक्रारी सोडविण्याची कार्यवाही करावी, असे जिल्हाधिकार्यांनी सांगितले.
या बैठकीत महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी म्हणाले, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व विभागाच्या अधिकार्यांनी प्राथमिक बैठकीत दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. जनतेच्या तक्रारी स्वीकारण्यासाठी आठ काउंटर उभारण्यात येणार आहेत.
प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी शुभम शुक्ला, निवासी जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी, एसीपी बसवराज कट्टीमणी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.