बेळगाव लाईव्ह:विश्वकर्मा समाजाला इतर मागासवर्गीय जातीचा दर्जा दिला जावा या मागणीसाठी आज श्री विश्वकर्मा सेवा संघातर्फे भव्य मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला निवेदन सादर करण्यात आले.
श्री विश्वकर्मा सेवा संघाचे अध्यक्ष रमेश देसुरकर व अन्य पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीची निवेदन आज बुधवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. यावेळी आपल्या मागणी संदर्भात बोलताना अध्यक्ष रमेश देसुरकर म्हणाले की, पहिल्यांदाच आमचा समाज आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून लढा देत आहे. भगवान विश्वकर्माने जगाची निर्मिती केली. त्याच विश्वकर्मा समाजाकडे सरकारचे दुर्लक्ष झाले आहे, तो मागे पडला आहे. त्यासाठी अन्य समाजांप्रमाणे आम्हालाही सरकारचे इतर मागासवर्गीय हे आरक्षण मिळावे अशी यांची मागणी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 17 सप्टेंबर रोजी जी योजना जाहीर करणार आहेत, ती संपूर्णपणे आमच्या समाजासाठी असावी ज्यामुळे आमच्या मुलाबाळांचे, समाजाचे भवितव्य उज्वल व्हावे.
श्रेणी प्रमाणे जाहीर करण्यात येणाऱ्या या योजनेचा लाभ प्रत्येक विश्वकर्मा समाज बांधवाला मिळावा या मागणीसाठी आम्ही बेळगावच्या विश्वकर्मा कमिटीच्या पदाधिकारी सदस्य तसेच खानापूर, कारवार, निपाणी, संकेश्वर, चिककोडी, कोल्हापूर, मुंबई येथील समस्त समाज बांधव आज पहिल्यांदाच संघटित झालो आहोत.
आज आमच्या समाज बांधवांना सरकारची कोणती सवलत मिळत नाही आहे असे सांगून यापुढे आर्थिक मदत वगैरे सरकारच्या सर्व योजनांचा लाभ आम्हा समाज बांधवांना मिळाला पाहिजे अशी आमची मागणी आहे, असे विश्वकर्मा समितीचे अध्यक्ष रमेश देसुरकर यांनी स्पष्ट केले.
याप्रसंगी श्री विश्वकर्मा सेवा संघाचे उपाध्यक्ष बाळू सुतार, सचिव राजू सुतार, उपसचिव ज्योतिबा लोहार, संदीप मंडोळकर, अरुण देसुरकर आदींसह विश्वकर्मा समाज बांधव उपस्थित होते. शहरातील राणी कित्तूर चन्नम्मा सर्कल येथून जोरदार निदर्शने करत काढण्यात आलेल्या मोर्चात बेळगाव शहरासह जिल्ह्यातील बहुसंख्य विश्वकर्मा समाज बांधव सहभागी झाले होते.