बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहराचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे नवे पोलीस उपायुक्त म्हणून रोहन जगदीश, आयपीएस (केएन -2019) यांनी गेल्या 6 सप्टेंबर रोजी अधिकार पदाची सूत्रे हाती घेतली. तेेंव्हापासून त्यांचे ट्विटर अकाउंट जनतेच्या सहाय्यार्थ, त्यांची चिंता मिटवण्यासाठी अतिशय सक्रिय झाल्याचे पहावयास मिळत आहे.
यापूर्वी तुलनात्मक दृष्ट्या कायदा व सुव्यवस्था विभागाच्या पोलीस उपायुक्तांचे हे अकाउंट गेली अनेक महिने निष्क्रियच होते. तथापि आयपीएस अधिकारी रोहन जगदीश यांचे नवे पोलीस उपायुक्त म्हणून आगमन होताच @DCP_LO_Belagavi हे ट्विटर अकाउंट पुनरुत्थानाचा अनुभव घेत आहे.
रोजच्या रोज अपडेट होणारे हे अकाउंट दारूशी संबंधित घटना, चोरीच्या घटनांमधील संशयित वगैरे रोजच्या रुटीन अपडेट्स पलीकडे जाऊन कार्य करू लागले आहे. रोहन जगदीश आयपीएस यांच्या नेतृत्वाखालील हे डीसीपी ट्विटर म्हणजे नागरिकांकरिता गैरप्रकार, समस्या वगैरेंच्या विरोधात आवाज उठवण्यासाठीचे त्वरित प्रतिसाद मिळणारे बहुमोल व्यासपीठ झाले आहे.
मोठ्या प्रमाणात सक्रिय झालेले हे अकाउंट कायद्याची अंमलबजावणी करणारे आणि जनता यांच्यामधील पारदर्शक आणि परिणामकारक संवादाचे दर्शन घडवत आहे.
अतिशय सक्रियपणे नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यामध्ये व्यस्त असलेले डीसीपी ट्विटर हँडल सध्या बेळगाव शहराचे वातावरण अधिक निर्भय व सुरक्षित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावू लागले आहे.
उदाहरणादाखल अलीकडेच रात्रीच्या गस्तीवर असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एमसीसीटीएनएस फिंगरप्रिंट स्कॅनरद्वारे 388 व्यक्तींची बारकाईने तपासणी केली होती. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना शोधून काढण्याद्वारे जनतेच्या सुरक्षेसह कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे हा या तपासणी मागचा मुख्य उद्देश होता. सध्या दररोज रात्री या पद्धतीने तपासणी सुरूच आहे.
या खेरीज शहापूर पोलिसांनी बेवारस पडून असलेल्या दुचाकी वाहन चालकांच्या मालकांना शोधून कागदपत्र वगैरे आवश्यक शहानिशा करून त्यांची वाहने त्यांना परत केली आहेत. तसेच उर्वरित जी बेवारस वाहने पडून आहेत त्यांच्या मालकांचा शोध घेतला जात आहे.
https://x.com/DCP_LO_Belagavi/status/1703458514826584494?s=20