बेळगाव लाईव्ह: इच्छाशक्ती, चिकाटी आणि एकाग्रतेने यश मिळते त्यामुळे आयएएस-केएएससह स्पर्धात्मक परीक्षा देण्यास अजिबात संकोच करू नका, इच्छूकांनी सातत्यपूर्ण सराव आणि प्रयत्नाने आपले ध्येय साध्य करा असे आवाहन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी केले.
जिल्हा प्रशासन आणि जिल्हा रोजगार विनिमय कार्यालय यांच्यातर्फे शामक कुमार गंधर्व रंगमंदिर येथे आयएएस आणि केएएस स्पर्धा परीक्षा इच्छूकांसाठी प्रशिक्षण कार्यशाळेत ते बोलत होते.
युवकांनी आपल्या कर्तृत्वाने आपल्या पालकांचे आपल्या गावाचे तालुक्याचे आणि जिल्ह्याचे राज्याचे देशाचे नाव मोठे करावे. मी देखील स्पर्धा परीक्षांना सामोरे जाऊ शकतो असा ठाम संकल्प करण्याची गरज आहे. परिश्रम, निष्ठा आणि सातत्यपूर्ण सरावाने यश मिळू शकते.
मातृभाषेतून शिक्षण झाले तरी, मनात कोणताही संकोच बाळगू नये. परीक्षेला सामोरे जाण्यासाठी आत्मविश्वास महत्त्वाचा आहे. रोज 8 ते 10 तास एकाग्रतेने सराव करावा. शासनाने यापूर्वीच सर्व श्रेणीतील विद्यार्थ्यांना अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. याचा लाभ घेऊन उच्च पदे मिळवावीत, अशी सूचनाही जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी केल्या.
यावेळी प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी साहित्या के. यांनी आपले अनुभव सांगितले. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना आणि आजूबाजूच्या वातावरणाचे निरीक्षण करताना चालू घडामोडी कळत असतात. तुम्ही निवडलेल्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी सखोल अभ्यास केला पाहिजे. प्रत्येक विषयाची सर्वसमावेशक माहिती मिळाल्यासच स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्यास मदत होईल, असे सांगितले.
रोज वर्तमानपत्र वाचण्याची सवय लावावी. अभ्यासासाठी कोचिंग सेंटरची गरज नाही. तुम्हाला अगदी गरज असेल तरच कोचिंग सेंटरमध्ये जा, त्याऐवजी माहितीसाठी इंटरनेट आणि सोशल नेटवर्किंग साइट्स आहेत. त्याचप्रमाणे यूट्यूबवर कोचिंग क्लास, स्किल डेव्हलपमेंट व्हिडीओजच्या माध्यमातून बरीच माहिती गोळा करून सराव करता येतो, असे प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी गजानना बढे यांनी सांगितले.
प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी शुभम शुक्ला, महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी, वित्त विभागाचे सहसंचालक शंकरानंद बनशंकरी, बंगळूर औद्योगिक प्रशिक्षण व रोजगार आयोगाच्या सहसंचालिका साधना पोटे, प्रांताधिकारी श्रवण नाईक, समाज कल्याण विभागाचे सहसंचालक लक्ष्मण बबली आदी उपस्थित होते.