बेळगाव लाईव्ह: ई-केवायसी करा अन्यथा पेन्शन बंद केली जाईल असा इशारा जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिला असून के वाय सी साठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.सामाजिक सुरक्षा आणि पेन्शन योजनेंतर्गत पेन्शन घेणार्या लाभार्थ्यांना 30 सप्टेंबरपूर्वी ई-केवायसी करणे अनिवार्य आहे. तत्पूर्वी लाभार्थ्यांनी आपला आधार क्रमांक बँक खात्याशी जोडावा अन्यथा त्यांची पेन्शन रद्द केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिला आहे.
जिल्ह्यात अजूनही 54,103 लाभार्थ्यांनी आपला आधार क्रमांक बँक खात्याशी जोडलेला नाही. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने पुन्हा कडक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार विहित मुदतीत नोंदणी न केल्यास लाभार्थ्यांची पेन्शन थांबविली जाणार आहे.
सामाजिक सुरक्षा व निवृत्ती वेतन योजनेंतर्गत ज्येष्ठ नागरिक पेन्शन, दिव्यांग, विधवा, संध्यासुरक्षा, चाळीस वर्षावरील अविवाहित महिलांसाठी मनस्विनी, तृतीयपंथीयांसाठी मैत्री आदी पेन्शन सुविधा उपलब्ध करून दिली जाते.
पेन्शन साठी बँक खात्याला आपला आधार क्रमांक जोडणे आवश्यक ठरले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 38 टक्के लोकांनी ई-केवायसी केले आहे. 62 टक्के लाभार्थ्यांनी इ-केवायसी केलेली नाही.
जिल्ह्यात ज्येष्ठ नागरिक पेन्शन योजना अंतर्गत 1,19,103 लाभार्थी शासनाची पेन्शन घेत असून संध्या सुरक्षा अंतर्गत 3,95,107, विधवा वेतन 1,42,661 ,
दिव्यांग पेन्शन 1,00,963, मैत्री 164, मनस्विनी, 12,145, अॅसिड हल्ला लाभार्थी 2 आणि आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबातील 573 लोकांना सामाजिक सुरक्षा योजना अंतर्गत पेन्शनचा लाभ मिळतो. यापैकी 54,103 लाभार्थ्यांनी अजूनही केवायसी केलेले नाही. त्यामुळे 30 सप्टेंबर ही अखेरची मुदत देण्यात आली आहे.