बेळगाव लाईव्ह :क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल कावळेवाडी (ता. बेळगाव) येथील उदयोन्मुख होतकरू क्रीडापटू प्रेम बुरुड आणि पैलवान रवळनाथ श्रीधर कणबरकर या दोघांचा जिल्हाधिकाऱ्यांनी सत्कार करून त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली.
कावळेवाडी गावातील इयत्ता सातवीत शिकणारा उदयोन्मुख खेळाडू प्रेम बुरुड आणि नववीत असलेला पैलवान रवळनाथ श्रीधर कणबरकर यांनी नुकत्याच झालेल्या शालेय स्पर्धेत घवघवीत यश संपादन करुन गावाचे नांव उज्ज्वल केले आहे. पै. रवळनाथ कणबरकर याने तर जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेतील 80 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक पटकावल्यामुळे त्याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
तो सध्या मठपती कुस्ती आखाडा सावगाव येथे सराव करतो. तसेच प्रेम यल्लापा बुरुड याने तालुकास्तरीय ॲथलेटिक्समध्ये 400 मी. व 600 मी.धावणे स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविल्यामुळे त्याची जिल्हास्तरावर निवड झाली आहे.
पळण्याचा कसून सराव करणाऱ्या प्रेम याने विविध ठिकाणच्या मॅरेथॉन स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी बजावली आहे. यांची दखल घेऊन सामाजिक कार्यकर्ते फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे अध्यक्ष संतोष दरेकर यांनी दोन शूज जोड, ट्रॅकसूट साॅक्स तसेच सुनील धोंगडे यांनी आर्थिक सहकार्य देऊन प्रेमला प्रेरणा दिली आहे.
आता जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी प्रेम आणि रवळनाथ या दोन गुणवंत खेळाडूंचा स्वतःच्या कार्यालयात सत्कार करून त्यांना प्रोत्साहित केले. दोन्ही खेळाडूंना उज्वल कारकिर्दीसाठी सुयश चिंतन्याबरोबरच जिल्हाधिकाऱ्यांनी भविष्यात या खेळाडूंना शासकीय सहकार्य केले जाईल असे आश्वासन दिले.
याप्रसंगी दोन्ही खेळाडूंना प्रोत्साहन देणारे वाय.पी.नाईक, संतोष दरेकर, यल्लापा बुरुड, भाऊराव कणबरकर, सुनील धोंगडे आदी उपस्थित होते. या सत्काराचे औचित्य साधून वाय. पी. नाईक यांनी कावळेवाडी गावच्या वाचनालयातर्फे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांना श्रीभगवदगीता ग्रंथ व पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा व्यक्त केल्या.