बेळगाव लाईव्ह :बेळगाव जिल्हा यंदा दुष्काळाच्या सावटाखाली असताना आश्वासक बाब म्हणजे यावर्षी जिल्ह्यातील 42,805 शेतकऱ्यांनी पिक विमा उतरवला आहे.
बेळगाव जिल्ह्यातील 15 पैकी 11 तालुके सध्या दुष्काळाच्या छायेत आहेत. गेल्यावर्षी केवळ 35 हजार 338 शेतकऱ्यांनी विमा कंपनीला एकूण 2.61 कोटी रुपये भरले होते. मात्र यंदा 42 हजार 805 शेतकऱ्यांनी पीक विमा भरला असल्यामुळे विमा कंपनीच्या खात्यात एकूण 2.91 कोटी रुपये जमा झाले आहेत. जिल्ह्यातील बैलहोंगल, कागवाड, अथणी, चिक्कोडी तालुक्यातील शेतकऱ्यांनी सर्वाधिक विमा भरल्याचे समजते. त्या तुलनेत बेळगाव, सौंदत्ती, कित्तूर या तालुक्यांमध्ये विमा हप्ता भरण्याचे प्रमाण कमी आहे. दरम्यान पुढील वर्षीही शेतकऱ्यांना पुरेसे विमा संरक्षण मिळेल अशी ग्वाही कृषी अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे कृषी खात्याचे सहसंचालक शिवानगौडा पाटील यांनी यंदा पावसाअभावी खानापूर आणि बेळगाव तालुका वगळता जिल्ह्यातील 11 तालुक्यात दुष्काळी समजले जात असून त्या अनुषंगाने सर्वेक्षण सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे.